मागील दहा दिवसांपासून मनोभावे पूजन करत पंचपंक्वानांच्या आस्वाद घेतल्यानंतर बाप्पांना निरोप देण्यात आला. शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या एकाच दिवशी ३८ हजार २१४ घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींसह गौरी आणि हरतारिकेचे विसर्जन झाले. कोविड पूर्वी विसर्जन करण्यात आलेलया या सर्व मूर्तींची संख्या ही ३४ हजार ५५५ एवढी होती. त्यामुळे यंदा कोविड निर्बंधमुक्त उत्सव साजरा करताना भक्तांनी अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पांची मनोभावे पूजा करत त्यांचा मुक्काम वाढवला आहे. त्यामुळे सन २०१९ मधील अनंत चतुर्दशीच्या दिवशी झालेल्या एकूण ३४ हजार ५५५ मूर्तींच्या संख्येच्या तुलनेत सन २०२२ मधील अनंत चतुर्दशीच्या दिवशी ३८ हजार २१५ मूर्तींचे विसर्जन झाल्याने यंदा या दिवशी साडेतीन हजार गणेश मूर्तींचे अधिक विसर्जन झाल्याचे दिसून येते.
श्री गणरायांचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन करण्यात आले असून, या एकाच दिवशी शनिवारी पहाटेपर्यंत एकूण ३८ हजार २१४ घरगुती, सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. यामध्ये ६६४७ सार्वजनिक उत्सव मंडळांच्या मूर्ती आणि ३१ हजार २५९ घरगुती गणेश मूर्तींचा समावेश होता. याशिवाय हरतालिका आणि गौरी अशाप्रकारे ३०८ मूर्तींचाही सामावेश होता.
( हेही वाचा: अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी ३ हजार ५०१ कोटी जिल्ह्यांना सुपूर्द )
अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक उत्सव मंडळाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन होत असल्याने, चौपाटींसह इतर तलावांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे नागरिकांना जास्तीत जास्त घराजवळ विसर्जनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून महापालिकेने कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. मुंबईतील १५२ कृत्रिम तलावांमध्ये या एकाच अनंत चतुर्दशीच्या दिवशी एकूण ९ हजार ७५१ मूर्तींचे विसर्जन केले. यामध्ये सार्वजनिक उत्सव मंडळाच्या ७९६ मूर्ती आणि ८ हजार ८७३ घरगुती मूर्ती आणि ८२ हरतालिका व गौरींचा समावेश आहे.
कोविडपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी ३४ हजार ५५५ सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. तर त्यानंतर सन २०२० मध्ये कोविड काळामध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्वात कमी मूर्तींचे अर्थात २६ हजार ४१६ गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले होते, तर त्यानंतर सन २०२१ मध्ये ३४ हजार ५८६ मूर्तींचे विसर्जन झाले होते.
Join Our WhatsApp Community