‘कोविड १९’ च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार मागील वर्षी गणेशोत्सव साधेपणाने, गर्दी टाळून व आवश्यक ती खबरदारी घेऊन साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे यंदाही मुंबईकरांना गणेशोत्सव साजरा करावा लागणार असून गणेशभक्तांची गर्दी टाळण्यासाठी महापालिकेच्यावतीने कृत्रिम तलावांच्या उभारणीवर भर दिला जाणार आहे. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही गणेश भक्तांना मूर्तीची विसर्जन करण्यासाठी १६७ ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी केली जाणार असून याव्यतिरिक्त जर कृत्रिम तलाव उभारण्याची आवश्यकता भासल्यास त्याप्रमाणे विभागाच्या सहायक आयुक्तांनी अतिरिक्त तलाव निर्माण करावेत,अशा सूचना महापालिका प्रशासनाने दिल्या आहेत.
समुद्रात गणेश मूर्ती विसर्जन करण्यास बंदी
मागील वर्षीप्रमाणे यंदाही समुद्रात गणेश मूर्ती विसर्जन करण्यास बंदी राहणार आहे. समुद्र किनाऱ्यापासून १ ते २ किलोमीटरवर असलेल्यांना समुद्रात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करता येईल, अशाप्रकारे निर्बंध घातले जाण्याची शक्यता आहे. मागील गणेशोत्सवात संपूर्ण मुंबईतील ७० नैसर्गिक स्थळे तसेच जवळपास १९९ कृत्रिम तलावांत मिळून सुमारे १ लाख ३५ हजार श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले होते. यापैकी कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्यात आलेल्या मूर्तींची संख्याही ७० हजार २३३ एवढी होती.
(हेही वाचा : रेल्वेपास मिळवण्यासाठी ‘ही’ आहे महापालिकेची नियमावली!)
विभाग स्तरावर खर्च करण्याची मुभा
महापालिका परिमंडळ २ उपायुक्त आणि गणेशोत्सवाचे महापालिका समन्वयक हर्षद काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर्षीही कृत्रिम तलावांवर अधिक भर दिला जाणार आहे. मागील गणेशोत्सवात १६७ कृत्रिम तलाव बनवले होते. त्यानुसार तेवढे तलाव प्रस्तावित आहे. पण यापेक्षा अधिक तलाव बनवण्याची मागणी असल्यास तिथेही बनवले जावेत, अशा सूचना विभागीय सहायक आयुक्तांना केल्या होत्या. यासाठी लागणारा खर्च हा विभाग स्तरावर खर्च करण्याची मुभा असून तशी तरतुदही आहे. त्यामुळे कुठेही निधी या तलावांच्या निर्मितीसाठी कमी पडणार नाही, असे काळे यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community