मागील पाच दिवसांचा लाडू, मोदकांसह पंचपंक्वांनांचा पाहुणचार घेत घराघरांत विराजमान झालेल्या बाप्पांनी तसेच माहेरवाशीण आलेल्या गौरीने शनिवारी निरोप घेतला. श्री गणरायाच्या आगमनापासून संततधार कोसळणाऱ्या पावसानेही गणेशोत्साच्या पाचव्या दिवशी सकाळपासून हजेरी लावल्याने भक्तांना शनिवारी भिजतच गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत बाप्पांना निरोप दिला. संततधार पावसातही भक्तांच्या उत्साहाला पारावार उरला नव्हता आणि ढोल ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप देताना गणेशभक्त भिजतच नाचताना बेभान होऊ गेले होते.
श्री गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मुंबईत ७३ नैसर्गिक स्थळी गणेश मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय मुंबईतील विविध ठिकाणी १९१ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व विसर्जन स्थळांवर महापालिकेच्यावतीने गणेश भक्तांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. बुधवारी दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन या सर्व विसर्जन स्थळांवर सुरळीत पार पडल्यानंतर शनिवारी पाच दिवसांच्या बाप्पांनी तसेच गौरी पंचपंक्वांनाच्या नैवेद्याचा आस्वादाचा पाहुणचार घेत निरोप घेतला.
(हेही वाचा One Nation One Election : कोविंद समितीची पहिली बैठक; कोण होते हजर, कोण गैरहजर?)
शनिवारी दुपारी सहा वाजेपर्यंत एकूण ८१९८ गणेश मूर्ती व गौरींचे विसर्जन पार पडले. त्यामध्ये सार्वजनिक ६१, घरगुती ७३९८ आणि गौरी ७३९ आदी मूर्तींचा समावेश होता. तर मुंबईतील १९१ कृत्रिम तलावांच्या विसर्जन स्थळांवर ३४४८ गणेश मूर्ती आणि गौरींचे विसर्जन पार पडले. त्यामध्ये सार्वजनिक २९, घरगुती ३११९ आणि गौरी ३०० आदी गणेश मूर्तींचा समावेश होता. त्यामुळे एकूण गणेश मूर्ती विसर्जनाच्या सरासरी ४० ते ४२ टक्के गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्यावर भाविकांचा भर होता, हे या आकडेवारींवरून स्पष्ट होत आहे.
सायंकाळी सहावाजेपर्यंत गणेश मूर्ती विसर्जन
- सार्वजनिक गणेश मूर्ती : ६१
- घरगुती गणेश मूर्ती : ७३९८
- गौरी : ७३९
- एकूण मूर्ती : ८१९८
कृत्रिम तलावातील गणेश मूर्ती
- सार्वजनिक गणेश मूर्ती : २९
- घरगुती गणेश मूर्ती : ३११९
- गौरी : ३००
- एकूण मूर्ती : ३४४८