मंगलमूर्ती गणरायाच्या आगमनाला आता अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले असताना बाजारात फुला-फळांची मागणी वाढते. या सणा उत्सवादरम्यान फुलांच्या दरात चांगली वाढ झालेली पाहायला मिळत आहे. श्रावण महिन्यापासून फुलांची मागणी वाढत असली, तरी गणेशोत्सवाला सुरुवात होण्याआधीच रविवारपासून झेंडूचे दर 60 ते 80 रुपयांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जास्वंद हे गणपती बाप्पाचे अतिशय आवडते फूल दुर्वांसोबत हे फूल वाहिले जातेच. यामुळे जास्वंद फुलाची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. यामुळे लाल रंगाच्या जास्वंद फुलांच्या दरात वाढ होते. त्यामुळे जास्वंद, लाल शेवंती, लाल गुलाब, अष्टर या फुलांच्या दरांनी शंभरी पार केली आहे.
कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फूल मार्केटमध्ये ३५० हून अधिक फूल विक्रेते असून श्रावण, गणेशोत्सव आणि दसऱ्याच्या काळात या मार्केटमध्ये फुलांची मागणी वाढते. संपूर्ण वर्षभराची कमाई याच काळात करता येत असल्याने विक्रेतेदेखील फुलांची आगाऊ मागणी नोंदवतात. नगर, नाशिकसह अनेक भागातून फुलांची आवक होत असून कल्याण या मुख्य बाजारातून विक्रेते फुलांची खरेदी करतात यामुळे एरव्ही पहाटे ३ पासून बाजारातील उलाढाल सुरू होत असली, तरी गणेशोत्सव जवळ येऊ लागताच फूल मार्केट बंदच होत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली , आणि कसारा, इगतपुरी, नाशिककडून आदिवासी महिलादेखील बाप्पाच्या पूजेसाठी लागणारी विविध प्रकारची पाने आणि फुले विक्रीसाठी आणतात. सर्व प्रकारच्या फुलांना कमीअधिक प्रमाणात मागणी वाढल्याने मागील महिन्याच्या तुलनेत फुलांचे दरांच्या किमतीत तिप्पट वाढ होण्याची शक्यता आहे.
जास्वंदीच्या एका फुलासाठी 20 ते 25 रुपये…
दादर फुल मार्केटमध्ये सध्या शेवंती 80 ते 120 रुपये, मोगरा 600 रुपये, तर गुलछडी 160 रुपये किलो दराने उपलब्ध आहे. जास्वंद हे बाप्पाचे अतिशय आवडते फूल. गणेशोत्सवात या फुलांना विशेष मागणी असते. त्यामुळे यंदा जास्वंदीच्या एका फुलासाठी भक्तांना 20 ते 25 रुपये मोजावे लागणार आहेत, तर 40 रुपयांना मिळणारा लाल गुलाब 150 रुपयांवर पोहोचला आहे.
नैसर्गिक फुलांची मागणी कमी
बाजारात सध्या प्लास्टिकच्या हार-फुलांच्या विक्रीचा ट्रेंड सुरू आहे. स्वस्तात मस्त आणि दीर्घकाळ टिकणारी ही फुले, हार ग्राहक खरेदी करतात. गणपती सजावटीसाठी ऑर्किड, लिली, शेवंती, कार्नेशन, रजनीगंधा, डिसबर्ड, रजनीगंधा, सनफ्लॉवर, जरबरा, जिस्पो, गुलाब आदी फुलांचा वापर होतो. ही फुले बंगळुरू, हिमाचल प्रदेश, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, कोकण येथून शोभिवंत फुले मार्केटमध्ये येतात. त्यामुळे नैसर्गिक फुलांची मागणी पूर्वीपेक्षा कमी झाली असल्याचे मत, दादरच्या गणेश फ्लोरा सेंटरचे मालक गणेश मोकल यांनी व्यक्त केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community