Ganeshotsav 2023 : यंदा सर्वोत्कृष्ट गणेश मंडळाला मिळणार ५ लाखांचे बक्षीस; सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

145
Ganeshotsav 2023 : यंदा सर्वोत्कृष्ट गणेश मंडळाला मिळणार ५ लाखांचे बक्षीस; सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सन २०२३ च्या गणेशोत्सवात (Ganeshotsav 2023) उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देण्यात येणाऱ्या पुरस्कार रकमेत वाढ करण्यात आली आहे. राज्यातील पहिल्या तीन विजेत्या क्रमांकांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे वने, मत्स्य व्यवसाय व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यामध्ये महानगर क्षेत्रातील पारितोषिकांची संख्या वाढविण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील पहिल्या तीन विजेत्या क्रमांकांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख रुपये व एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. राज्य समितीकडे जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या ४४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी वरील प्रमाणे तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून उर्वरित ४१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

(हेही वाचा – छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक)

या पुरस्कारासाठीच्या २४ लाख ६० हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या पुरस्कारांसाठी निवड होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी विविध निकष असतील. त्यांना गुण दिले जातील. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल, असे मंत्री मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

निकष काय?

– या स्पर्धेसाठी पर्यावरणपूरक मूर्तीसाठी दहा गुण, पर्यावरणपूरक सजावट (थर्मोकोल, प्लास्टिक विरहीत) १५ गुण, ध्वनिप्रदूषण रहित वातावरणासाठी पाच गुण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन आदी समाजप्रबोधन, सामाजिक सलोख्यासंदर्भातील सजावट, देखाव्यासाठी २० गुण
– स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने सजावट, देखाव्यासाठी २५ गुण असतील.गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबिर, वर्षभर गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौर ऊर्जाबद्दल जागरुकता निर्माण करणे, रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) चालविणे, वैद्यकीय केंद्र चालविणे आदी सामाजिक कार्यासाठी २० गुण
– शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आरोग्य आदीबाबत केलेल्या कार्याबद्दल १५ गुण, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटकांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक आदीबाबत केलेल्या कार्यासाठी १५ गुण, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांसाठी १० गुण
– पारंपरिक, देशी खेळांच्या स्पर्धेसाठी दहा गुण असतील. गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा उदा. पाणी, प्रसाधनगृह, वैद्यकीय प्रथमोपचार, वाहतुकीस अडथळा येणार नाही, असे आयोजन, आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छतेसाठी प्रत्येकी पाच असे २५ गुण मिळून अशी १५० गुणांची ही स्पर्धा असणार आहे.

सहभागी होण्यासाठी

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या [email protected] या ई- मेल आयडीवर १० जुलै ते ५ सप्टेंबर २०२३ या कालावधीत नोंदणी करावी लागेल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.