Ganeshotsav 2024 : जुहू चौपाटी, वेसावे चौपाटीवर महानगरपालिका आयुक्त फिरले

1004
Ganeshotsav 2024 : जुहू चौपाटी, वेसावे चौपाटीवर महानगरपालिका आयुक्त फिरले
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

श्री गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2024) कालावधीत सार्वजनिक स्वच्छता आणि सुस्थितीतील रस्ते या दोन्ही बाबींवर सर्वाधिक प्राधान्याने लक्ष पुरवावे. संपूर्ण उत्सव कालावधीत महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी अधिक कार्यतत्पर आणि सजग रहावे. भाविक, नागरिक यांना कोणत्याही असुविधा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी संबंधितांना दिले. गणेश मूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य कलशाची व्यवस्था, वैद्यकीय चमू, जीवरक्षकांची नेमणूक, सार्वजनिक स्वच्छता याकडे सर्व यंत्रणांनी विशेषत्वाने लक्ष पुरवावे, असे देखील निर्देश गगराणी यांनी दिले.

शनिवारी ७ सप्टेंबर २०२४ पासून श्री गणेशोत्सवास (Ganeshotsav 2024) प्रारंभ होतो आहे. त्या अनुषंगाने नागरी सेवा-सुविधांविषयक तयारीचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी जुहू चौपाटी आणि वेसावे (वर्सोवा) चौपाटी यांना मंगळवारी ३ सप्टेंबर २०२४ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. सहआयुक्त (परिमंडळ – ४) विश्वास शंकरवार, के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. या पाहणी दरम्यान महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी सर्वसामान्य नागरिक, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक, जीव रक्षक यांच्याशी संवाद साधला.

(हेही वाचा – Naxalite Attack: दंतेवाड्यात सुरक्षा दलांना मोठे यश; शोध मोहिमेत ९ नक्षलवाद्यांचा खात्मा)

गगराणी यांनी संबंधितांना दिले ‘हे’ निर्देश 

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी म्हणाले की, यंदाच्या गणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून विविध स्तरावर पूर्वतयारी करण्यात आली आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, स्वच्छता विसर्जन मार्गांवर वृक्ष छाटणी आदी कामे देखील सुरू आहेत. मूर्ती आगमन आणि विसर्जन मार्गावर प्रशासन विशेष लक्ष पुरवत आहे. महानगरपालिकेने धोकादायक पुलांची नावे यापूर्वी जाहीर केली आहेत. त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेशी समन्वय साधून रहदारी सुरळीत ठेवावी. श्री गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2024) काळात अधिक सजगतेने आणि कार्यतत्परपणे कामकाज करणे आवश्यक आहे. सार्वजनिक स्वच्छतेच्या अनुषंगाने मुख्य रस्त्यांबरोबरच लहानसहान रस्ते, गल्ली बोळ, झोपडपट्टी आणि तत्सम वस्ती अशा सर्व ठिकाणी स्वच्छता राखावी. समुद्रकिनारे, चौपाटींवर अधिक स्वच्छता ठेवावी. कचरा संकलन आणि वाहतूक फेऱयांची वारंवारता वाढवावी, असे देखील निर्देश महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी संबंधितांना या पाहणीवेळी दिले.

कृत्रिम तलाव, वाहन आधारित फिरते कृत्रिम तलाव, निर्माल्य वाहक फिरते वाहन, लोंबकळणाऱ्या तारा, विसर्जन स्थळावर कार्यरत स्वयंसेवक, पेयजल, प्रसाधनगृह, वाहनतळ, जर्मन तराफे, निर्माल्य कलश आदींचा देखील भूषण गगराणी यांनी यावेळी आढावा घेतला. गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) हा सर्वांसाठी उत्सवाचा सण आहे. हा सण पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करावा. गणेशोत्सवादरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या वतीने चांगल्या सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी दिले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.