Ganeshotsav 2024 : गणेशोत्सव मंडळांना येत्या ६ ऑगस्टपासून ऑनलाईन परवानगी, मंडप उभारणीसाठी १०० रुपयांचे शुल्क

1149
Ganeshotsav 2024 : गणेशोत्सव मंडळांना येत्या ६ ऑगस्टपासून ऑनलाईन परवानगी, मंडप उभारणीसाठी १०० रुपयांचे शुल्क

पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ (Ganeshotsav 2024) सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने ६ ऑगस्ट २०२४ पासून एक खिडकी योजनेनुसार संगणकीय प्रणालीद्वारे सार्वजनिक श्री गणेश मंडळांना मंडप उभारणीसाठी ऑनलाइन परवानगी देण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार यंदाच्या गणेशोत्सवात गेली दहा वर्ष शासन नियमांचे व कायद्याचे पालन करणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सलग पाच वर्षांकरिता विभाग कार्यालयामार्फत एकदाच परवानगी देण्यात येणार आहे. याकरिता सार्वजनिक अथवा खासगी जागेवर गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना मागील दहा वर्षात सर्व नियम कायदे यांचे पालन केले आहे व त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नाही, असे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार आहे. असे असले तरी दरवर्षी परवानगी नूतनीकरण करणे गरजेचे असेल,असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा श्री गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. मुंबई महानगराची सांस्कृतिक ओळख असणारा श्री गणेशोत्सव ७ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होत आहे. हा उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी महानगरपालिका सातत्याने विविध स्तरिय प्रयत्न करित आहे. यंदा महानगरपालिका प्रशासनाने उत्सवादरम्यान विविध स्तुत्य उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून उत्कृष्ट काम करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना यावर्षीपासून सलग पाच वर्षांसाठी परवानगी देण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Pooja Khedkar ला मोठा झटका; कधीही होऊ शकते अटक)

एक खिडकी योजनेद्वारे प्राप्त अर्जांची विभागीय कार्यालयाकडून छाननी करण्यात येईल त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशन वाहतूक पोलीस विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन प्राप्त करून नियमानुसार मंडपासाठी परवानगी देण्यात येणार आहे. यंदा नव्यानेच सार्वजनिक उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांसाठी देण्यात येणारी मंडप उभारण्याची परवानगी ही या वर्षासाठीच मर्यादित असेल. यंदाच्या गणेशोत्सवाचे (Ganeshotsav 2024) वेगळेपण म्हणजे संपूर्ण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी सलग पाच वर्षांकरिता परवानगी देण्यात येणार आहे, तसेच या मंडळांना दरवर्षी या परवानगीचे नूतनीकरण करावे लागणार आहे. या नुतनीकरणात वाहतूक आणि स्थानिक पोलिसांची परवानगी प्राप्त करणे आवश्यक असेल. याशिवाय खासगी जागेवर परवानगी प्राप्त झालेल्या मंडळांना उत्सवापूर्वी विहित कालावधीत जागामालक अथवा सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच वाहतूक पोलीस व स्थानिक पोलीस यांची परवानगी प्राप्त करून घेणे आवश्यक असेल.

सार्वजनिक जागेवरील गणेशोत्सव मंडपाकरिता १०० रुपये शुल्क

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना (Ganeshotsav 2024) सन २०२४ च्या उत्सवासाठी अवघे १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

इथे करता येणार मंडप उभारण्यासाठी ऑनलाईन अर्ज

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजेपासून संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर > For Citizen > Apply > Pandal (Ganpati/Navratri) या लिंकवर जाऊन दि. ६ ऑगस्ट २०२४ पासून अर्ज सादर करता येईल. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन मुंबई महानगरपालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावातच करावे, असे आवाहन उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी केले आहे. (Ganeshotsav 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.