- विशेष प्रतिनिधी, मुंबई
सन २०२४ चा गणेशोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी महानगरपालिका प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी दरवर्षी मूर्तीकारांना शाडूची माती आणि जागा मोफत उपलब्ध करून देण्यात येते. या उपक्रमाला मूर्तीकारांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. त्याच अनुषंगाने सन २०२५ मध्ये देखील पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मूर्तीकारांनी शाडूच्या मूर्ती साकारण्यावर भर द्यावा. यासाठी महानगरपालिकेकडून मूर्तीकारांना जास्तीत-जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच त्यांना गतवर्षीप्रमाणे यंदाही शाडू माती आणि जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने उप आयुक्त (परिमंडळ-२) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी स्पष्ट केले आहे. (Ganeshotsav 2025)
‘गणेशोत्सव २०२५’ च्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका प्रशासन, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, मूर्तीकार संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात गुरुवारी १९ डिसेंबर २०२४ ‘एफ दक्षिण विभाग’ कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उप आयुक्त (परिमंडळ-२) तथा मुंबई महानगरपालिका गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे हे बोलत होते. या बैठकीला जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी, के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू, एन विभागाचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे आदी उपस्थित होते. तसेच, मुंबई उपनगर श्रीगणेशोत्सव समन्वय समितीचे सचिव विनोद घोसाळकर, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, मूर्तिकार संघटनेचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. (Ganeshotsav 2025)
(हेही वाचा – Bus Accident: लग्नासाठी निघालेली बस ताम्हिणी घाटात उलटली; ५ जणांचा मृत्यू, २५ जखमी)
महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असणारा श्री. गणेशोत्सव मुंबई महानगरात मोठ्या उत्साहात साजरा होतो. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून मूर्तीकारांना दरवर्षी मोफत शाडू माती, मंडप उभारण्याकरिता जागा यासह विविध सोयी-सुविधा पुरविल्या जातात. सन २०२५ मध्ये नियोजित गणेशोत्सवास दरवर्षीप्रमाणे महानगरपालिकेकडून नागरी सेवा-सविधा पुरविल्या जातील. गणेशोत्सव पर्यावरणपूरक रीतीने साजरा करण्यासाठी मूर्तीकारांनी शाडूच्या मूर्ती साकारण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने उप आयुक्त (परिमंडळ-२) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी केले आहे. (Ganeshotsav 2025)
दरम्यान, बैठकीत मूर्तीकारांच्या सूचनाही जाणून घेण्यात आल्या. पदाधिकारी, प्रतिनिधी आणि मूर्तीकारांच्या सूचनांचा महानगरपालिका प्रशासनाकडून सकारात्मक विचार करून सहकार्य केले जाईल, असे आश्वासन सपकाळे यांनी यावेळी दिले. गतवर्षी महानगरपालिकेने शाडू माती आणि जागा उपलब्ध करून दिल्यामुळे मोठी मदत झाल्याचे मूर्तीकारांनी नमूद केले. तसेच कृत्रिम तलावांची निर्मिती करणे, झाडांची सुयोग्य प्रकारे छाटणी करणे आणि रस्त्यांच्या परिरक्षणाची कामे करणे, यासारखी विविध कामे मुंबई महानगरपालिकेद्वारे गतवर्षी चांगल्याप्रकारे करण्यात आली. या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर साधण्यात येणारा सुसमन्वय हा निश्चितच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गारदेखील उपस्थित पदाधिकाऱ्यांनी काढले. त्याचबरोबर, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून महानगरपालिकेला सहकार्य केले जाईल, असेदेखील यावेळी पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. यावेळी, उत्सवी आणि पुनरावर्तन या संस्थेच्या प्रतिनिधींनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा करावा याबाबतचे मार्गदर्शन केले. तसेच त्यासंबंधिचे उपस्थितांसमोर संगणकीय सादरीकरणही केले. (Ganeshotsav 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community