यंदाच्या गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट कायम आहे. मागील वर्षी गणेशोत्सवासाठी जी नियमावली ठरण्यात आली होती, तीच नियमावली यंदाच्याही वर्षी लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये विशेष करून सार्वजनिक गणेशोत्सावासाठी गणेश मूर्तीची उंची ४ फूट ठरवण्यात आली आहे, तसेच घरगुती गणपतीसाठी २ फुटाची उंची मर्यादित करण्यात आली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना! यंदाही सार्वजनिक गणेशोत्सवासाठी ४ फूट, घरगुतीसाठी २ फूट, अशी मूर्तीसाठी उंचीची मर्यादा घातली आहे. आगमन-विसर्जन मिरवणुकीवर प्रतिबंध करण्यात आला आहे.
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) June 29, 2021
काय म्हटले आहे नियमावलीत?
- यंदाच्या वर्षी श्रीगणेश आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढू नये. विर्सजनस्थळी आरती करू नये. तसेच त्या ठिकाणी फार गर्दी करू नये.
- सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.
- कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी.
- या वर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे.
- उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.