Ganpati Visarjan 2024: पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सुसज्ज

118
Ganpati Visarjan 2024: पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सुसज्ज
Ganpati Visarjan 2024: पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सुसज्ज

मुंबईतील श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) यंदाही अधिकाधिक विविध सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. मंगळवार, दिनांक १७ सप्टेंबर २०२४ रोजी अनंत चतुर्दशी दिनी होणा-या श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. विसर्जन सुलभ, निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani), अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सुमारे १२ हजार अधिकारी – कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयीसुविधांसह सुसज्ज आहेत. यंदा गणेश मूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांवर व्यवस्था आहे, अशी माहिती उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक श्री. प्रशांत सपकाळे यांनी दिली आहे. (Ganpati Visarjan 2024)

श्रीगणेशोत्सव अंतर्गत स्वराज्य भूमी (गिरगांव चौपाटी) येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डी विभागामार्फत भाविकांसाठी विविध नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी स्वराज्यभूमीला भेट देवून संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली व योग्य ते निर्देश दिले. 

उप आयुक्त श्री. प्रशांत सपकाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार,  मुंबईतील घरगुती तसेच सार्वजनिक श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी मागील दोन महिन्यांपासून पूर्वतयारी सुरू आहे. श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी येणारे वाहन चौपाटीवरील वाळूमध्ये अडकू नयेत व श्री मूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडावे, याकरीता चौपाटीच्या किना-यांवर ४७८ स्टील प्लेट तसेच छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी ४३ जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. चौपाट्यांवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ७६१ जीवरक्षकांसह ४८ मोटरबोटी तैनात केल्या आहेत. विसर्जनापूर्वी भाविकांनी अर्पण केलेले हार, फुले इत्यादी निर्माल्य जमा करण्यासाठी १६३ निर्माल्य कलशांसह २७४ निर्माल्य वाहनांचीही सोय करण्यात आली आहे.  

(हेही वाचा – Jio Finance Share : जिओ फायनान्स सुरू करणार स्वत:ची वित्तीय संस्था, मोठ्या बँकांवर होणार परिणाम)

महानगरपालिकेच्या विविध खात्यातील कर्मचा-यांमध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी मुख्य नियंत्रण कक्षासह प्रशासकीय विभागांच्या स्तरावर १९२ नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तर सुरक्षेच्या दृष्टीने ६६ निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत. विविध ठिकाणी ७२ स्वागत कक्ष तयार करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाकडून ७५ प्रथमोपचार केंद्रांसह ६७ रुग्णवाहिका देखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. प्रभावी प्रकाश योजनेसाठी ‘बेस्ट’ च्या सहकार्याने खांबांवर व उंच जागी सुमारे १,०९७ फ्लडलाईट आणि २७ सर्चलाईट लावले आहेत. विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी १२७ फिरती प्रसाधनगृहं सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनासहीत प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहेत.  (Ganpati Visarjan 2024)

‘क्यूआर कोड’वरही मिळणार कृत्रिम तलावांची माहिती

याशिवाय ‘क्यू आर कोड’द्वारे देखील भाविकांना, गणेश भक्तांना कृत्रिम तलावांची माहिती मिळणार आहे. हा ‘क्यू आर कोड’ स्कॅन केल्यावर मुंबईतील कृत्रिम तलावांची माहिती आणि गुगल मॅप लिंक भाविकांना उपलब्ध होणार आहे. यामुळे मुंबईतील यंदाचा गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक होण्यासाठी मदत होणार आहे. 

नागरिकांनी श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करताना काळजी घ्यावी:  प्रशासनाकडून आवाहन

अनंत चतुर्दशी दिनी सर्व विसर्जनस्थळी नागरिकांनी पावित्र्य व मांगल्य जपावे. उत्सवादरम्यान गर्दीच्या तसेच विसर्जनस्थळी जबाबदारीने आणि सतर्कतेने वागावे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस दलाद्वारे दिल्या जाणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

विसर्जनादरम्यान घ्यावयाची काळजी 

१. समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करु नये.

२. मूर्ती विसर्जनाकरीता महानगरपालिकेमार्फत नेमलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्यावी.

३. अंधार असणा-या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाकरीता जाणे टाळावे.

४. महानगरपालिकेने पोहण्याकरीता निषिद्ध केलेल्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करू नये.

५. समुद्रात किंवा तलावात कुणी बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित अग्निशमन दलाचे जवान, पोलिस किंवा जीवरक्षकांना कळवावे.

६. अफवा पसरवू नका किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.

७. भाविकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना पाण्यात जाऊ देऊ नये.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी भरती आणि ओहोटीवेळी नागरिकांनी काळजी घ्यावी

यंदा अनंत चतुर्दशी दिवशी (दिनांक १७ सप्टेंबर २०२४) समुद्रात सकाळी ११.१४ वाजता ४.५४ मीटरची भरती,  सायंकाळी ५.२२ वाजता ०.८६ मीटरची ओहोटी, रात्री ११.३४ वाजता ४.३९ मीटर उंचीची भरती असेल. दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी पहाटे ५.२७ मिनिटांनी ०.४८ मीटरची ओहोटी, सकाळी ११.३७ वाजता ४.७१ मीटरची भरती,  सायंकाळी ५.४९ वाजता असेल. या भरती तसेच ओहोटीदरम्यान विसर्जनासाठी चौपाट्यांवर येणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.