महालक्ष्मीतील कचरा उचलणाऱ्या कंपनीने अचानक थांबवले काम; महापालिकेकडून कचरा उचलण्यासाठी होते कसरत

मुंबई शहरातील देवनार तथा कांजूरमार्ग येथील भराव भूमीवर टाकण्यापूर्वी महालक्ष्मी कचरा हस्तांतरण केंद्राच्या ठिकाणी जमा केला जातो. याठिकाणी दरदिवशी ६०० मेट्रीक टन कचरा संकलित केला जात असून याठिकाणांहून हा कचरा देवनार तथा कांजूरमार्गला नेऊन टाकला जातो. याठिकाणचा कचरा उचलून कांजूरमार्ग भराव भूमीच्याठिकाणी विल्हेवाट लावण्यासाठी दोन वर्षांकरता नेमलेल्या कंत्राटदारांने एक वर्षांत हे काम बंद केले. मात्र मुदतपूर्व काम करणाऱ्या कंपनीवर महापालिकेने कोणतीही कारवाई केलेली नसून आता आधी दोन महिने आणि त्यानंतर तीन महिने या कालावधीकरता निविदा मागवून महालक्ष्मीतील कचरा उचलला जात आहे. मात्र, यापूर्वी आकारलेल्या दराच्या तुलनेत आता अल्प निविदेतील पात्र कंपन्यांनी कमी दराची बोली लावत काम मिळवल्याने यापूर्वीच्या कंत्राटदाराने कचऱ्याच्या नावाखाली महापालिकेची तिजोरी लुटल्याची बाब समोर आली आहे.

( हेही वाचा : म्हाडा इमारतींबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय! हजारो कुटुंबांना दिलासा )

महालक्ष्मी कचरा हस्तांतरण केंद्र येथे जमा करण्यात येणारा शहर भागातील कचऱ्याची विल्हेवाट देवनार तथा कांजूरमार्ग येथील कचरा भराव केंद्रावर लावण्यासाठी स्थायी समितीच्या मंजुरीने जून २०२१ मध्ये दोन वर्षांकरता सिटी ट्रेडींग कार्पोरेशन या कंपनीला काम देण्यात आले होते. त्यानंतर या कंपनीने १८ जून २०२१ रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. परंतु या कंत्राट कंपनीला दोन वर्षांकरता म्हणजे जून २०२३पर्यंत हे कंत्राट दिलेले असताना या कंपनीने २९ जून २०२२ रोजी कचरा उचलण्याचे काम अचानक बंद केले. त्यानंतर महापालिकेने मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून दोन वर्षांचे कंत्राट दिले. याचा कालावधी २७ ऑगस्ट २०२२ रोजी संपुष्टात आला आहे. त्यानंतर आणखी दोन महिन्यांकरता कंत्राट दिले याचाही कालावधी १५ सप्टेंबर २०२२ रोजी संपुष्टात आला. त्यामुळे पुढील दिर्घ कालावधीकरता काढण्यात येणाऱ्या निविदेला विलंब होणार असल्याने आता महापालिकेने तीन महिन्यांकरता निविदा मागवून कचरा उचलण्याच्या काम थांबू नये याची काळजी घेतली.

मागील दोन महिन्यांकरता काढलेल्या अल्प मुदतीच्या निविदांमध्ये कंत्राट कंपनीने प्रति मेट्रीक टनासाठी कचऱ्यासाठी ४५० रुपये एवढा दर आकारला होता, परंतु आता याच एक टनाच्या कचऱ्यासाठी पुढील तीन महिन्यांसाठी मागवलेल्या निविदेमध्ये पात्र ठरलेल्या के. के. कॅरिअर या कंपनीने ३७२ रुपये दर आकारला आहे. त्यामुळे महापालिकेच्या मजबुरीचा फायदा घेऊन प्रति मेट्रीक टनासाठी ४५० रुपयांचा दर आकारुन महापालिकेची तिजोरी लुटल्याची बाब समोर येत आहे.

के.के. कॅरिअर या कंपनीने महापालिकेच्या अंदाजित ३१० रुपये प्रति मेट्रीक टनाच्या तुलनेत ३९० रुपयांचा दर आकारला. परंतु महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा २५ टक्के अधिक असल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वाटाघाटी केल्यानंतर त्यांनी प्रति मेट्रीक टनासाठी ३७२ रुपये एवढा दर आकारला आहे.

यापूर्वीच्या दोन वर्षांकरता नेमलेल्या कंत्राट कंपनीने वर्षभरातच थांबवले. वाहनांची संख्या व त्यांचे होणारे फेरे यांची संख्या दररोजच्या कचरा वाहतूक करण्यासाठी पुरेशी नसल्या कारणाने महालक्ष्मी हस्तांतरण केंद्राजवळील रहिवाशी यांच्याकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सिटी ट्रेडींग कार्पोरेशन या कंपनीने आपले काम अचानक थांबवले असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here