मुंबईतील कचऱ्यासंदर्भात महापालिकेच्यावतीने हेल्पलाईन सुरु केल्यानंतर तक्रारींचा पाऊस पडू लागला आहे. परंतु हा कचरा उचलण्यावर भर दिला जात असल्याचे सांगितले जात असले तरी अनेक ठिकाणी कंत्राटदारांच्या गाड्याच वेळेवर उपलब्ध होत नसल्याने महापालिकेच्या सफाई कामगारांना केवळ प्रतीक्षाच करावी लागत आहे. परिणामी अनेक सोसायट्यांमध्ये कचऱ्याच्या पेट्या भरलेल्या पहायला मिळत आहे. डम्पिंग ग्राऊंडवर पावसामुळे चिखल आणि दलदल निर्माण झाल्याने वाहने आतमध्ये कचरा टाकून वेळेवर परत येत नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
मुंबई महापालिकेने सन २०१८मध्ये सहा वर्षांकरता कचरा उचलण्यासाठी वाहने पुरवणे आणि कांदिवली, बोरीवली, दहिसर आणि मुलुंड या भागांमध्ये वाहनांसह मनुष्यबळाचा पुरवठा करणे आदीसह कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली. सहा वर्षांसाठी तब्बल १८०० कोटींचे कंत्राट देण्यात आले असून आता मात्र प्रशासकांच्या काळात तर कचरा उचलून नेणारी वाहनेच उपलब्ध होत नसल्याची माहिती मिळत आहे. माहिम, दादर शिवाजीपार्क आदी भागांमध्ये मागील काही दिवसांमध्ये महापालिकेचे सफाई कामगार तसेच कंत्राटी सफाई कामगार कचरा उचलण्यासाठी वेळेवर जागेवर पोहोचत असले तरी प्रत्यक्षात कचरा उचलणारी वाहनेच पोहोचत नसल्याच्या तक्रारी मिळत आहेत. ही कचऱ्याची वाहने उपलब्ध होत नसल्याने सफाई कामगारांना सोसायटीसह अनेक भागांमधील पेट्यांमध्ये जमा झालेला कचरा वाहनांमध्ये नेऊन टाकता येत नाही. परिणामी अनेक सोसायट्यांमध्ये वाहनांअभावी कचरा उचलला जात नसून कचरा पेट्या भरलेल्या स्थितीत दिसत आहे.
मुंबई महापालिकेने मागील काही दिवसांपासून रस्त्यांवरील कचऱ्यांच्या ढिगांचे निर्मुलन करण्यासाठी हेल्पलाईन सुरु केली असून तेव्हापासूनच ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारींचे निवारण करण्याचा एका बाजुला प्रयत्न होत असताना दुसरीकडे वाहनांअभावी सोसायट्यांसह अन्य भागांमध्ये जिथे पेट्यांमध्ये कचरा जमा होतो, तो कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही दिसून येते. सोसायट्यांमधील हा कचरा उचलण्यासाठी सफाई कामगार स्वत: उपस्थित राहत असतानाही वाहनांअभावी त्यांना हा कचरा दैनंदिन उचलता येत नसल्याचे बोलले जात आहे. कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांमध्ये सर्वांधिक वाहने ही कंत्राटदारांकडून पुरवण्यात येत असून काही अंशी वाहने ही महापालिकेच्या मालकीची आहेत. त्यामुळे महापालिकेच्या मालकीची वाहने ही आरटीओच्या नियमानुसार जुनी झाल्याने त्याचा वापर होत नसल्याने बऱ्याच भागांमध्ये वाहनेही अपुरी पडत असल्याचे बोलले जात आहे.
(हेही वाचा – आंगाडियांना लुटणाऱ्या टोळीला ८ तासांत अटक, ३३ लाखांच्या दागिने लुटून केला होता पोबारा)
शिवाय पावसाळा सुरु झाल्यानंतर डम्पिंग ग्राऊंडवर चिखल, दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे कचरा नेऊन टाकणाऱ्या वाहनांचा प्रवास धिमा बनला असून डम्पिंग ग्राऊंडबाहेर कचऱ्याच्या रांगा लागलेल्या पहायला मिळत आहे. या कचऱ्याची वाहने डम्पिंग ग्राऊंडवरुन कचरा टाकून मागे येत नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याचेही बोलले जात आहे. दादर, माहिम प्रमाणे अंधेरी जोगेश्वरी भागांमध्येही अशाचप्रकारे कचरा उचलला जात नसून अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढिग तसेच सोसायट्यांमधील कचरा उचलला जात नसल्याची तक्रारी येत असल्याचे शिवसेना उबाठा गटाच्या माजी नगरसेविका राजुल पटेल यांनी सांगितले. मुंबईतील अनेक भागांमध्ये हीच समस्या असून डम्पिंग ग्राऊंडवर अत्यंत सावधपणे वाहने चालवून कचरा रिकामा करून यावे लागते. जर हे वाहन मध्येच पलटी झाल्यास वाहन बाहेर काढेपर्यंत कचरा टाकण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रत्येक पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि पावसाळ्यात कचऱ्याच्या वाहनांची ही समस्या पहायला मिळत असल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे छोट्या वाहनांमधून कचरा गोळा करून मोठया कॉम्पॅक्टरमध्ये आणून जमा करण्याचा प्रयत्न केला जातो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community