धारावीत खुलणार आता नंदनवन! रहिवाशी घेणार मोकळा श्वास!

धारावीकरांसाठी ४०० मीटरच्या जागेत जॉगिंग ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, २५ हजार चौरस फुटाच्या जागेत खेळाचे मैदान, नाल्याच्या बाजुचा परिसरात मियावकी पध्दतीने झाडांचे रोपण, खुल्या व्यायामशाळेचे बांधकाम केले जाणार आहे.

83

धारावीमध्ये प्रेमनगर येथील बीकेसी कनेक्टर खालील खुल्या जागेत तब्बल ८७ हजार चौरस फुटाच्या जागेवर उद्यान व खेळाचे मैदान विकसित केले जाणार आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरून बीकेसीला जोडल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या खालील जागेत तसेच मोकळ्या झालेल्या आरक्षित जागेत उद्यान व खेळाचे मैदान बनवले जणार आहे. या जागांचा विकास करतानाच महापालिकेच्या वतीने ५० शौचकुपांचे एका शौचालयांचे बांधकाम सीएसआर निधीतून केले जाणार आहे. त्यामुळे धारावीत आता नंदनवन खुलणार असून धारावीकरांना मोकळ्या हवेत श्वास घेता येणार आहे.

८७ हजार चौरस फुटांचे क्षेत्र मोकळे केले!

वांद्रे-कुर्ला संकुलातून पूर्व द्रुतगती महामार्गावर जाण्यासाठी बांधलेल्या पुलाच्या खाली तसेच आसपासच्या परिसरात काही जागा मोकळी झाली आहे. या जागांवरील झोपड्या तसेच बांधकामांचे अतिक्रमण हटवून येथील तब्बल ८७ हजार चौरस फुटांचे क्षेत्र मोकळे करण्यात आले आहे. त्यामुळे या मोकळ्या जागेवर मनोरंजन मैदान व खेळाच्या मैदानाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत निविदा मागवण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या मोकळ्या जागांवर ४०० मीटरच्या जागेत जॉगिंग ट्रॅक तथा वॉकिंग ट्रॅकचे बांधकाम केले जाणार आहे. तर २५ हजार चौरस फुटाच्या जागेत खेळाचे मैदान, नाल्याच्या बाजुचा परिसरात मियावकी पध्दतीने झाडांचे रोपण, लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान तसेच खुल्या व्यायामशाळेचे बांधकाम केले जाणार आहे. यासाठी सुमारे १.६८ कोटी रुपयांचा खर्च अंदाजित आहे. जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून दाटीवाटीने वसलेल्या धारावीत आता मनोरंजन मैदान आणि खेळाच्या मैदानात भर पडणार आहे.

(हेही वाचा : उत्तर भारतीयांमुळे होणार मनसेचा घात?)

हरित पट्टा निर्माण करण्यावर भर

धारावीसारखा परिसर झोपड्यांनी व्यापलेला आहे. तसेच धारावीची ओळख झोपडपट्टी अशीच असताना येथील भागात हरित पट्टा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी निविदा मागवली असून निविदा प्रक्रिया पार पाडून कंत्राटदाराची निवड केली जाणार आहे. त्यानंतर सर्वप्रकारच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असा विश्वास जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केले.

New Project 3 5

धारावीतील या कामाचे श्रेय कोण घेणार?

धारावीतील या मोकळ्या झालेल्या जागांवर खेळाचे मैदान, मनोरंजन मैदान, वॉकींग ट्रॅक यासाठी स्थानिक आमदार व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला. त्यानंतर यावर मोकळ्या जागेचा विकास करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. परंतु धारावीमध्ये तीन नगरसेवक हे शिवसेनेचे असून काँग्रेसच्या बालेकिल्ला असलेल्या या धारावीत शिवसेना चांगल्याप्रकारे हातपाय पसरु पाहत आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने केल्या जाणाऱ्या या कामांचे श्रेय शिवसेना आपल्या झोळीत पाडून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे मंत्री असलेल्या वर्षा गायकवाड यांना आता याचे सर्व श्रेय घेण्यासाठी शिवसेनेशीच संघर्ष करावा लागणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसशी शिवसेनेला दोन हात करावे लागणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धारावीतील या हरित पट्टयाचा विकास महत्वाचा मानला जात आहे.

(हेही वाचा : यंदाही गणेशोत्सवात महापालिका उभारणार १६७ कृत्रिम तलाव!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.