बदलापूर एम.आय.डी.सीत वायू गळती… लोकांना श्वास घेण्यास त्रास

३ जून रोजी रात्री 10.22च्या सुमारास बदलापूर पूर्व येथील आपटेवाडी भागात शिरगाव एम.आय.डी.सी. येथे मे.नोबेल इंटरमीडिएट्स प्रा.लि. या कंपनीमध्ये केमिकल रिअॅक्शन होऊन गॅस गळती झाली. त्यामुळे ३ कि.मी.च्या परिसरातील लोकांना श्वास घेण्यास व डोळे चुरचुरण्याचा त्रास होऊ लागला होता. प्रशासनाने रात्रीच घटनास्थळी धाव घेऊन वायू गळतीचे कॉक बंद केले. त्यामुळे वायू गळती थांबवण्यात यश आले आहे.

काय झाले नेमके?

मे.नोबेल इंटरमीडिएट्स प्रा.लि. या कंपनीमध्ये ओव्हरहिट मुळे सल्फ्युरिक अॅसिड व बेंझिल्स अॅसिड मध्ये केमिकल रिअॅक्शन होऊन गॅस गळती झाली. घटनास्थळी बदलापूर अग्निशमन दलाचे कर्मचारी दोन फायर वाहनांसह व शिरगाव एम.आय.डी.सी. अग्निशमन दलाचे १ फायर वाहन तातडीने दाखल झाले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांकडून गॅस गळती थांबवण्यात आली असून, रात्री 11.24 च्या सुमारास परिस्थिती नियंत्रणात आली आहे. सदर घटनेत कोणालाही दुखापत किंवा प्राणहानी झाली नसल्याचे, बदलापूर अग्निशमन केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार कळत आहे.

प्रशासनाचे आवाहन

या सर्व प्रकरणात नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच ही वायू गळती होत असताना, परिसरातील नागरिकांनी एक तासभर घराच्या बाहेर पडू नये, असे अग्निशमन दल आणि प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले होते. झालेली वायू गळती ही फारशी विषारी नसून, कंपनीची पहाणी करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here