लोकल…मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेली ही लोकल सध्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू आहे. मात्र आता मागील 15 दिवसांची आकडेवारी पाहिली, तर या 15 दिवसांत लोकल प्रवाशांची संख्या ही 31 लाखांवर पोहोचली आहे. लोकल प्रवासात फक्त अत्यावश्यक सेवेतील, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी यांना प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र, लाॅकडाऊनचे नियम शिथिल होताच इतर प्रवाशांची घुसखोरी वाढली आहे.
म्हणून वाढली लोकलमध्ये गर्दी!
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लोकल प्रवासास मोजक्याच अत्यावश्यक सेवेतील, वैद्यकीय सेवेतील, रुग्ण, दिव्यांग यांना परवानगी दिली आहे. त्यातच आता एसटीने देखील आपली सेवा बंद केली आहे. त्यामुळे आपले कामाचे ठिकाण गाठण्यासाठी सर्वसामान्य मुंबईकरांनी लोकल प्रवासास सुरूवात केली आहे. रस्ते मार्गाने नोकरीचे ठिकाण गाठणे खिशाला परवडणारे नसल्याने आणि पैशांचा अपव्यय होत असल्याने अनधिकृतपणे सर्वसामान्य प्रवासी लोकल प्रवास करत आहेत. सकाळ आणि सायंकाळच्यावेळी लोकलमध्ये प्रवाशांची पूर्वीसारखी धक्काबुक्की, दरवाज्यावर उभे राहून प्रवास करणे, असे प्रकार सुरू झाले आहेत.
घरातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्याने महिन्यांच्या खर्चाचे गणित जुळले जात नाही. तसेच वाहतूक खर्च वाढल्याने प्रवाशांचे जगणे कठिण झाले आहे. प्रशासनाने सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास खुला करण्यात यावा. कोरोनाचे लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी उपनगरीय लोकल सुरू करण्यात यावी. प्रशासनाने तत्काळ रेल्वे सेवा सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– नंदकुमार देशमुख, अध्यक्ष उपनगरीय प्रवासी महासंघ
यांचे होतात प्रचंड हाल!
कल्याण-कसारा, कर्जत, खोपोली, वसई-विरार, नालासोपारा या भागातून रस्ते मार्गाने मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. यासह कल्याण, डोंबिवली येथून बसने प्रवास केल्याने कंबरदुखी, मणक्याचे आजार वाढण्याचे कारण ठरत आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमती, वाहतूककोंडी, मुसळधार पाऊस, कमी झालेला पगार, वाया जाणारा वेळा यामुळे प्रवासी प्रचंड वैतागले आहेत.
(हेही वाचा : माजी आमदार विवेक पाटील यांना अटक! )
अशी आहे प्रवासी संख्या
मध्य रेल्वे
5 जून – 11 लाख
10 जून – 12 लाख 50 हजार
15 जून – 15 लाख
पश्चिम रेल्वे
5 जून – 9 लाख 50 हजार
10 जून – 13 लाख
15 जून – 16 लाख
(हेही वाचा : शैक्षणिक शुल्कावर नियंत्रण ठेवणारी समिती काय करते? उच्च न्यायालयाकडून विचारणा )