सर्वसामान्य नागरिकांना उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी ऑनलाईन ई-पास मिळणार!

कोरोनाचा दुसरा डोस घेवून १४ दिवस पूर्ण न झालेल्या नागरिकांनी अर्ज केला तर त्यांना १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच ई-पास उपलब्ध होईल.

सर्वसामान्यांना उपनगरीय रेल्वे प्रवास करता यावा यासाठी ऑफलाइन कोविड लसीकरण पडताळणी प्रक्रिया आणि त्याआधारे रेल्वे पास वितरण प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता ऑनलाईन ई-पास सुविधादेखील महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. web‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’ असे त्याचे नाव असून या पद्धतीमुळे नागरिकांना प्रवासासाठी अतिशय सुलभतेने ई-पास मिळवणे शक्य होणार आहे. त्यासाठी https://epassmsdma.mahait.org ही लिंक शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाकडून थेट मासिक प्रवास पास उपलब्ध

महाराष्ट्र राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचारी आणि नागरिकांना ई-पास देण्यासाठी वेब लिंक यापूर्वीच विकसित केली आहे. या वेब लिंकचा उपयोग करून आता सर्वसामान्य मुंबईकर नागरिकांना देखील मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी ई-पास उपलब्ध होणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि नागरिकांसाठी वापरात असलेल्या वेब लिंकमध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रवासाचा पास देण्याकरिता अतिरिक्त सुविधा उपलब्ध केली आहे. https://epassmsdma.mahait.org ह्या लिंकचा उपयोग करून मुंबईकरांना आता युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास मिळू शकतील. सदर लिंक सर्व वेब ब्राऊजरवर उपलब्ध असेल. हा ई-पास मोबाईलमध्ये जतन करुन, उपनगरीय रेल्वे स्थानकांवर तिकीट खिडकीवर सादर केल्यानंतर नागरिकांना रेल्वे प्रशासनाकडून थेट मासिक प्रवास पास उपलब्ध होईल. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर पुन्हा ऑफलाईन पडताळणीची आवश्यकता राहणार नाही.

(हेही वाचा : ओशो आश्रम नष्ट करण्याचा कट! सीबीआय चौकशीची मागणी)

दुसऱ्या डोसनंतर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यावर ई-पास!

या ई-पास सुविधेनुसार, ज्या नागरिकांचे कोविड लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत आणि दुसरा डोस घेवून किमान १४ दिवस पूर्ण झाले आहेत, ते नागरिक या ई पाससाठी पात्र असतील. जे पात्र नागरिक पाससाठी अर्ज करतील, त्यांचे कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची (दुसरा डोस घेवून १४ दिवस पूर्ण झाल्याची) पडताळणी ह्या लिंकवर आपोआप होईल. त्यासाठी वेगळ्या मानवी कार्यवाहीची आवश्यकता राहणार नाही. विशेष म्हणजे दुसरा डोस घेवून १४ दिवस पूर्ण न झालेल्या नागरिकांनी अर्ज केला तर त्यांना १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच ई-पास उपलब्ध होईल.

अशी आहे युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई-पास पद्धती!

सर्वप्रथम पात्र नागरिकांनी https://epassmsdma.mahait.org ही वेब लिंक उघडावी. त्यावर Travel Pass for Vaccinated Citizens यावर क्लिक करावे. त्यानंतर नागरिकांनी आपला कोविड लसीकरणासाठी नोंदविलेलाच मोबाईल क्रमांक नमूद करावा. लगेचच मोबाईलवर ओटीपी अर्थात एकवेळ वापरासाठीचा पासवर्ड लघुसंदेश (एसएमएस) द्वारे प्राप्त होईल. हा ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकाचे नाव, मोबाईल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक इत्यादी तपशील आपोआप समोर दिसतील. त्यामध्ये ‘पास निर्माण करा’ (जनरेट पास) या पर्यायावर क्लिक करावे. त्यावर क्लिक करताच अर्जदाराचा तपशील तसेच कोविड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याचा दिनांक इत्यादी सर्व तपशील आपोआप दिसेल. या तपशिलामध्ये ‘सेल्फ इमेज’ या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र अपलोड करावे. मोबाईल गॅलरीतून छायाचित्र अपलोड करता येवू शकते किंवा मोबाईल कॅमेऱयाद्वारे जागीच छायाचित्र (सेल्फी) काढून देखील अपलोड करता येईल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील ४८ तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास करीता लघुसंदेश (एसएमएस) द्वारे लिंक प्राप्त होईल, असा संदेश झळकेल. लिंक प्राप्त झाल्यानंतर ई पास मोबाईलमध्ये जतन करुन, उपनगरीय रेल्वे स्थानकांवर तिकिट खिडकीवर सादर करावा, त्याआधारे रेल्वे पास प्राप्त करता येईल. उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील ऑफलाइन कोविड लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया आणि त्यासोबत ऑनलाइन ई-पास पद्धत देखील सुरु झाल्याने पात्र सर्वसामान्य नागरिकांना दिनांक १५ ऑगस्ट २०२१ पासून उपनगरीय रेल्वे प्रवास करणे शक्य होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पडताळणी प्रक्रियेसाठी कृपया रेल्वे स्थानकांवर गर्दी न करता, टप्प्या-टप्प्याने जावून अथवा ऑनलाईन पद्धतीचा उपयोग करुन पडताळणी पूर्ण करावी.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here