देवनारमधील कचऱ्यापासून वीज निर्मिती : प्रत्यक्षात प्रकल्प सुरु व्हायला २०२४ उजाडणार

मुंबईत दरदिवशी निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर शास्त्रोक्तपणे प्रक्रिया करणे बंधनकारक असूनही आजही देवनार क्षेपणभूमीवर ६०० ते ७०० मेट्रीक टन कचरा जात असून उर्वरीत पैंकी ५ हजार मेट्रीक टन कचरा हा कांजूर मार्ग क्षेपणभूमीमध्ये टाकला जातो. सध्या देवनार आणि कांजूर क्षेपणभूमी वापरात असून या दोन्ही क्षेपणभूमीवर कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. मात्र, देवनार क्षेपणभूमी येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन एक वर्षांहून अधिक कालावधी उलटून जावूनही अद्यापही या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात या प्रकल्पाच्या उभारणीला अजून दोन ते अडीच वर्षांचा कालावधी जाणार असल्याने याठिकाणच्या कचऱ्यावर तुर्तास तरी येथील कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया जाणार नाही.

( हेही वाचा : सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना थकित रक्कम त्वरित द्यावी, राज्य मानवाधिकार आयोगाचे आदेश)

मुंबईत दरदिवशी सरासरी ५८०० ते ६२०० एवढा कचरा निर्माण होत असून ८०० मेट्रीक टन एवढे डेब्रीज निर्माण होते. यातील कांजूरमार्ग क्षेपणभूमीवर पाच हजार मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रीया केली जाते. यामध्ये ४००० ते ४५०० मेट्रीक टन कचऱ्यावर बायोरिऍक्टर तंत्राद्वारे प्रक्रिया करण्यात येते तर एक हजार मेट्रीक टन कचऱ्यावर खत निर्मिती तंत्राद्वारे प्रक्रिया करण्यात येते. मुंबईतील हिच एकमेव क्षेपणभूमी आता शिल्लक राहिलेली असून सर्वांत मोठी क्षमता असलेल्या देवनार क्षेपणभूमीची क्षमता संपुष्टात आल्याने याठिकाणी केवळ दरदिवशी निर्माण होणारे डेब्रीज स्वरुपात ५५० ते ६०० मेट्रीक टन कचरा टाकला जातो.

प्रत्यक्षात २०२४पासून येथील कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती केली जाईल

कांजूरमार्ग क्षेपणभूमीवरील कचऱ्यावर शास्त्रोक्तपणे प्रक्रिया करण्यात येत असली तरी देवनारमधील कचऱ्यावर शास्त्रोक्तपणे प्रक्रिया करण्यासाठी ६०० मेट्रीक टन कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या पहिल्या टप्प्यातील कामाचे कंत्राट डिसेंबर २०२०मध्ये देण्यात आले आहे. ४ मेगा वॅट क्षमतेची वीज निर्मिती करण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या उभारणीचेच प्राथमिक काम सध्या सुरु असून याला अजुन दोन ते अडीच वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे देवनारवरील कचऱ्या प्रक्रिया करून त्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्पाला प्रत्यक्षात सुरु व्हायला २०२५ उजाडले जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात येथील कामाला सुरुवात व्हायला विलंब आहे. महापालिकेच्या माध्यमातून भविष्यात याठिकाणी १२०० मेट्रीक टन कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प राबवण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात येत असले तरी पहिल्या टप्यातील कामाला अद्याप सुरुवात नसल्याने महापालिकेला या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी अजुन तरी काही वर्षे थांबवावे लागणार आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त डॉ. संगीता हसनाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या देवनारमधील ६०० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होत आहे. या प्रकल्पांची पूर्ण उभारणी झाल्यानंतर प्रत्यक्षात २०२४पासून येथील कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती केली जाईल. या ६०० मेट्रीक टन कचऱ्याबरोबरच भविष्यात २४०० मेट्रीक टन कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प टप्प्याटप्प्याने सुरु करायचा असून याबाबत तांत्रिक समिती पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here