Ghatkopar Hoarding Accident : तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांचे निलंबन

204
Ghatkopar Hoarding Accident : तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांचे निलंबन

घाटकोपर येथे कोसळलेल्या होर्डिंग दुर्घटना प्रकरणात लोहमार्ग पोलीस दलाचे तत्कालीन पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कैसर खालीद हे महाराष्ट्र कॅडरचे १९९७ आयपीएस अधिकारी आहेत. कैसर खालीद हे सध्या नागरी हक्क संरक्षण येथे अपर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. (Ghatkopar Hoarding Accident)

पोलिस वेल्फेअर निधीसाठी राखीव असलेल्या घाटकोपर पूर्व येथील जागेवर इगो मीडिया या कंपनीकडून उभारण्यात आलेले महाकाय होर्डिंग १३ मे रोजी कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता. तर ८० जण जखमी झाले होते. लोहमार्ग पोलिसांच्या अखत्यारीत येणाऱ्या या जागेवर उभारण्यात आलेल्या या बेकायदेशीर होर्डिंगला लोहमार्ग रेल्वे पोलीस दलाचे तत्कालीन पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी मंजुरी दिली होती. (Ghatkopar Hoarding Accident)

(हेही वाचा – Ghatkopar Hoarding Accident : होर्डिंगच्या मार्फत लोहमार्ग पोलिसांना मिळाले 11 लाख रुपये)

याप्रकरणी पंतनगर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने या प्रकरणात इगो मीडिया कंपनीचे मालक भावेश भिंडे, माजी संचालिका जान्हवी मराठे सह चार जणांना अटक केली होती. विशेष तपास पथकाकडून या प्रकरणात लोहमार्ग पोलीस तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यासह अनेकांचे जबाब नोंदविण्यात आले आहे. विशेष पथकाच्या तपासात तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्ताचा बेजबाबदारपणा आढळून आला आहे. या अनुषंगाने सध्या नागरिक हक्क संरक्षण महाराष्ट्र राज्य येथे अप्पर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत असलेले कैसर खालिद यांचे निलंबन करण्यात आले आहे. राज्याच्या गृहविभागाने मंगळवारी खालिद यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांची पत्नी संचालक असलेल्या कंपनीच्या सहसंचालक असलेला अर्षद खान याची १५ दिवसांपूर्वी विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्यात आली होती अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. अर्षद खानला इगो मीडियाकडून धनादेशच्या माध्यमातून मोठी रक्कम मिळाली होती. अर्षदने नाव न टाकता मोठ्या रकमेचे धनादेश इगो मिडियाकडून स्वीकारले होते आणि हे धनादेश गोवंडी शिवाजी नगर येथील १० ते १५ व्यक्तीच्या बँक खात्यावर टाकून त्यांच्याकडून रोख रक्कम काढून घेतली होती, असे विशेष तपास पथकाच्या तपासात समोर आले आहे. इगो मिडियाकडून ही रक्कम काय म्हणून देण्यात आली, तसेच त्याने या रकमेचे काय केले याबाबत तपास करण्यासाठी अर्षदला पुन्हा चौकशीसाठी लवकरच बोलविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.