मुंबईत धावत्या लोकलमध्ये पुन्हा तरुणीचा विनयभंग; गुन्हा दाखल

तरुणाविरोधात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

254
मुंबईत धावत्या लोकलमध्ये पुन्हा तरुणीचा विनयभंग; गुन्हा दाखल

मुंबईकरांची लाईफ लाईन असणाऱ्या लोकल ट्रेनमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी हार्बर मार्गावरील लोकल ट्रेनमध्ये एका २० वर्षीय विद्यार्थिनीवर लैगिग अत्याचार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पश्चिम मार्गावरील लोकल ट्रेनमध्ये एका तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. या दोन घटनांमुळे पुन्हा एकदा ट्रेनमधील महिला सुरक्षा या विषयाची चर्चा सुरु झाली आहे.

नेमका प्रकार काय?

पश्चिम रेल्वेवरील ग्रॅन्ट रोडजवळ धावत्या लोकलमध्ये एका तरुणाने २४ वर्षीय तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. या तरुणाविरोधात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालाड येथे राहणारी तरुणी शुक्रवारी (२३ जून) रात्री कामानिमित्त चर्नी रोड येथे लोकलने जात होती. अशातच ग्रॅन्ट रोड स्थानकावर एक अज्ञात व्यक्ती त्या ट्रेनच्या डब्यात घुसला आणि त्याने त्या तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याने अश्लील भाषेचाही उपयोग केला. त्यानंतर तरुणीने आरडाओरडा केला असता त्या तरुणाने लोकलचा वेग कमी होताच उडी मारून तेथून पळ काढला. याप्रकरणी बुधवारी (२८ जून) मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार दाखल केली. या आधारे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

(हेही वाचा – मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांना ईडीचे समन्स)

या सर्व प्रकारामुळे महिलांच्या डब्याला दिवसाही सुरक्षा देण्याची मागणी होत आहे. लोकलमध्ये महिलांवर होणारे अत्याचार ही काही आजची घटना नाही. त्यामुळेच या घटनांना आळा घालण्यासाठी महिलांच्या डब्यामध्ये रात्री ९ ते सकाळी ६ अशी पोलिसांची गस्त असते. पण आता जर भर दिवसा अशा घटना घडत असतील तर मग दिवसाही पोलिसांची सुरक्षा महिला डब्ब्याला द्या अशीच मागणी प्रत्येक महिला प्रवाशाकडून होत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.