कोरोना लसीकरणाचा काही जणांवर दुष्परिणाम झाला, त्यातील काही जणांना प्राण गमवावे लागले. अशाच एका मुलीला प्राण गमवावे लागले, त्यामुळे त्या मुलीच्या वडिलांनी थेट न्यायालयात धाव घेतली असून तब्बल १ हजार कोटींची नुकसान भरपाई मागितली आहे.
या मुलीच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दिलीप लुणावत असे याचिकाकर्त्यांचे नाव आहे. मुलगी स्नेहल हिला लस घेण्यापूर्वी संबंधित लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले होते. स्नेहल ही आरोग्य सेविका होती. त्यामुळे तिला लस घेण्यास भाग पाडले होते. तिने लस सुरक्षित असल्याच्या हमीच्या आधारे लस घेतली होती. मात्र लस सुरक्षित असण्याचा दावा खोटा ठरला आहे. तिचा लसीच्या दुष्परिणामांमुळेच मृत्यू झाला, असा दावा करीत याचिकाकर्ते लुणावत यांनी भरपाईची मागणी केली आहे.
(हेही वाचा आता मध्य रेल्वेचा 72 तासांचा जम्बो मेगाब्लाॅक! जाणून घ्या कोणत्या ट्रेन रद्द?)
लसीच्या दुष्परिणामामुळे मृत्यू झाल्याचे सरकारकडून मान्य
लुणावत यांनी आपल्या याचिकेत ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या संचालकांनाही जबाबदार धरले आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या संचालकांनी कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित असल्याचा दावा केला होता. वास्ताविक हा दावा खोटा असल्याचे मुलीच्या मृत्यूमुळे सिद्ध झाले आहे, असे लुणावत यांनी याचिकेत म्हटले आहे. केंद्र सरकारच्या AEFI समितीनेही स्नेहलचा मृत्यू कोविशील्ड लसीच्या दुष्परिणामांमुळे झाल्याचे मान्य केले आहे. लुणावत यांच्यावतीने अभिषेक मिश्रा आणि दीपिका जैस्वाल या अधिवक्त्यांनी रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला, महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, आणि एम्सचे संचालक गुलेरिया यांना प्रतिवादी बनवण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community