वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा तसेच महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. मागच्या दोन वर्षांच्या कोरोना काळात जवळजवळ शाळा आणि महाविद्यालये बंदच राहिली आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. पण, दुसरीकडे मात्र दारुची दुकाने चालू आहेत. त्यांना शिक्षणापेक्षा जास्त महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे मला या ऑनलाइन शिक्षणापेक्षा देशी दारुच्या दुकानाचा परवाना द्यावा अशी मागणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी पवन जगडमवार याने शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.
ऑनलाइन शिक्षण लादलं जातंय
ऑनलाइन शिक्षणात येणा-या अडचणींमुळे संतप्त होऊन त्याने जिल्हाधिका-यांमार्फत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन केले आहे. या निवेदनात त्याने म्हटले आहे की, गोरगरिब विद्यार्थांचा कसलाही विचार न करता ऑनलाइन शिक्षण लादले जात आहे. माझ्याकडे चांगला मोबाईल, लॅपटाॅप, संगणक तसेच इतर साहित्य नाही. त्यामुळे मी ऑनलाइन शिक्षण कसे घेऊ? असा सवालही या विद्यार्थ्याने केला आहे.
( हेही वाचा: सर्वच औषध पुरवठादारांनी हाफकिनला काळ्या यादीत टाकले, वाचा काय आहे कारण )
देशी दारुचा परवाना द्या
बार, रेस्टाॅरंट, चित्रपटगृहे, निवडणुका आदींना परवानगी दिली जाते, विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात नाही. दारुच्या दुकानात होणारी गर्दी चालते, पण लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात जाऊन ऑफलाइन शिक्षण घ्यायला मात्र परवानगी नाही. त्यामुळे मलाही देशी दारुच्या दुकानाचा परवाना द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्याने आपल्या निवेदनात केली आहे.
Join Our WhatsApp Community