वाघ हा अभिमानाचा विषय असून वाघाची गती आणि शक्ती हे पराक्रमाचे प्रतिक मानले जाते. जगातील 14 देशात वाघ असून त्यापैकी 65 टक्के वाघ भारतात आहेत. जगातील सर्वाधिक वाघ हे एकट्या चंद्रपुरात आहे. चंद्रपुरात देश– विदेशातील पर्यटक आनंदित आणि उत्साहात राहतील, याची सर्वांनी काळजी घ्या. येथे मिळालेली सन्मानाची वागणूक पर्यटकाला आयुष्यभर लक्षात राहिली पाहिजे,असा सल्ला वनमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. बुधवारी ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत मोहर्ली येथे 7.42 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणा-या पर्यटन गेटच्या कामाचे भूमीपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) प्रवीण चव्हाण, ताडोबाचे क्षेत्रसंचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, राजस्थानच्या वन्यजीव बोर्डाचे सदस्य सुनील मेहता, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, मोहर्लीच्या सरपंच सुनिता कातकर, हरीष शर्मा, डॉ. मंगेश गुलवाडे, संध्या गुरुनुले, छायाचित्रण दिग्दर्शक नल्ला मुथ्थू आदी उपस्थित होते.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, ”वाघ हा सामर्थ्याचे प्रतिक आहे.जगातील सर्वाधिक वाघ आपल्या चंद्रपुरात आहेत. विदर्भाला जगाचे टायगर कॅपिटल म्हटले जाते. जगातील अनेक मान्यवरांची पावले ताडोबाकडे वळतात. त्यामुळे येथे येणा-या प्रत्येक पर्यटकाला सन्मानाची वागणूक द्यावी. आपल्या चुकीच्या आचरणाने ताडोबाच्या नावाचा अपप्रचार होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. देशातील सहा व्याघ्र प्रकल्पाला उत्तम मानांकनाचा दर्जा मिळाला आहे. या सहापैकी 3 व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील आहेत. वन विभागाच्या अधिकारी कर्मचा-यांसोबतच गावक-यांनीसुध्दा जंगलांचे संवर्धन, संरक्षण केले आहे आणि त्रासही सहन केला आहे.”
(हेही वाचा – I.N.D.I.A आघाडीपासून AAP फारकत घेणार? )
मोहर्ली गाव पर्यटकीय सेवा केंद्र होणार
ताडोबाचे मुख्य आकर्षण असलेल्या मोहर्ली गावात सर्वंकष सुंदरता आणण्यासाठी आराखडा तयार केला जाईल. मोहर्ली गावासाठीसुध्दा आकर्षक प्रवेशद्वार उभारण्यात येईल. गावात पायाभूत सुविधांसोबतच आर्किटेक्टच्या माध्यमातून गावातील भिंती रंगविणे, आकर्षक मूर्ती लावणे आदी बाबींमधून पर्यटकीय सेवाकेंद्र म्हणून मोहर्ली नावारूपास येईल, असे मुनगंटीवार म्हणाले.
वाढत्या मानव-वाघ संघर्षाबाबत उपाय
मानवी जीवन अनमोल आहे. उपजीविकेसाठी जे जंगलात जातात, त्यांच्यावर वन्यप्राण्यांचा हल्ला होण्याचे प्रमाण जास्त आहे. यावर उपाययोजना म्हणून डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेतून आपण गावांना निधी उपलब्ध करून देत आहोत.
ताडोबातील वाघांचे स्थलांतर
चंद्रपूरात वाघांची संख्या लक्षणीय वाढल्यामुळे स्थलांतर करण्यात येत आहे. ताडोबातील 2 वाघिणींना नागझिरा अभयारण्यात पाठविण्यात आले. पुढे 8 वाघ सह्याद्रीमध्ये सोडण्यासाठी भारत सरकारची परवानगी मागितली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community