-
विशेष प्रतिनिधी,मुंबई
अंधेरी पूर्व – पश्चिमेचा महत्त्वाचा दुवा असलेला गोपाळकृष्ण गोखले पुलाची (Gokhale Bridge) उंची ही पश्चिमेला सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाशी जोडण्याचे काम वेगाने आणि ठरवलेल्या वेळापत्रकानुसार सुरू आहे. बर्फीवाला पूल हा गोखले पुलाच्या उंचीसोबत जोडण्याच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेकडून वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय) तसेच तांत्रिक सल्लागाराच्या देखरेखीखाली कामे प्रगतिपथावर आहेत.
अस्तित्वात असलेल्या सी. डी. बर्फीवाला पुलाची पातळी उंचावून ती नवीन बांधलेल्या गोखले पुलाच्या (Gokhale Bridge) पातळीला जोडण्याचे काम दिनांक १४ एप्रिल २०२४ पासून सुरू करण्यात आले आहे. सी. डी. बर्फीवाला पुलाची पातळी उचलण्याची कार्यपद्धती व सर्वसाधारण आराखडा हा भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी) तसेच वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय) यांचेद्वारे आरेखित केला गेला.
(हेही वाचा – Veer Savarkar : हिंदुत्वाची १०१ वर्षे)
ही कार्यपद्धती वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (VJTI) यांचेद्वारे बनवण्यात आली, तर भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबई यांनी या कार्यपद्धतीची पडताळणी करून त्यात काही सुधारणा सुचवल्या. सदर सुधारित कार्यपद्धतीची अंमलबजावणी ही बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (VJTI) यांच्या निरीक्षणाखाली करण्यात येत आहे.
सी. डी. बर्फीवाला पुलाच्या शेवटच्या दोन तुळई (गर्डर) म्हणजेच पी ९ ते पी १० आणि पी १० ते पी ११ हे वेगळे करणे. सदर तुळई वेगळी करण्यासाठी पीलर – पी ९ आणि पीलर – पी १० येथील आर. सी. सी. जॉईंट नियंत्रित पद्धतीने व पुलाच्या संरचनेला कोणताही धोका न पोहोचवता तोडणे. गर्डर पी ९ ते पी १० तसेच पी १० ते पी ११ हे समक्रमित (synchronised) प्रणाली द्वारे उचलणे व गोखले पुलाच्या (Gokhale Bridge) पातळीशी जुळवणे. गोखले पुलाशी सी. डी. बर्फीवाला पुलाची पातळी जुळाल्यानंतर तोडलेले जॉइंट पुन:श्च एकदा काँक्रिटिंग करणे. नवीन बिअरिंग व जोडणी सांधे (एक्स्पांशन जॉइंट) बसविणे, आदी कामांचा समावेश आहे.
कामांची प्रगती अशाप्रकारे सुरू आहे…
- बर्फीवाला पुलाची पातळी ही पीलर पी १० येथे सुमारे ७५० मिलीमीटर इतकी उचलण्याचे प्रस्तावित होते. त्यानुसार, ही पातळी जुळवण्याचे काम सद्यस्थितीला पूर्ण झाले आहे.
- तसेच, पीलर पी-११ येथे सुमारे १,३५० मिलीमीटर इतकी पातळी उचलण्याचे प्रस्तावित होते. त्यापैकी सुमारे १,२५० मिलीमीटर इतके उचलण्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित १०० मिलीमीटर पातळी उचलण्याचे काम येत्या २ ते ३ दिवसात पीलर ११ येथे जुळवण्याचे नियोजित आहे.
- नवीन बिअरिंगसाठी कार्यादेश देवून त्या आणण्यात आल्या. नवीन बिअरींगची चाचणी आज (दिनांक २७ मे २०२४) पूर्ण झाली आहे. हे नवीन बिअरींग प्रकल्पस्थळी तत्काळ आणण्यात येतील.
- उर्वरीत काम म्हणजे पी ९, पी १० आणि पी ११ येथील आर. सी. सी. काँक्रिट करणे, नवीन बिअरिंग बसविणे हे काम दिनांक ५ जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. काँक्रिटच्या क्युरिंगनंतर हे काम पूर्णत्वास जाईल.
हे काम सुरू करताना दिनांक ३० जून २०२४ हा पूर्णत्वाचा दिवस निश्चित केला होता. त्या वेळापत्रकानुसार सध्या कामे सुरू आहेत,असे महापालिका पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community