गोकुळने दूध खरेदी दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. या वाढीचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. गायीच्या दूध खरेदीमध्ये गोकुळने १ रुपयाची वाढ केली आहे. ११ सप्टेंबरपासून नव्या दरांची अंमलबजावणी होणार आहे. गुरुवारी, ८ सप्टेंबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये भाववाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले.
मुंबईत म्हशीच्या दुधासाठी ६६ रुपये मोजावे लागत होते
११ सप्टेंबरपासून गायीच्या ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ प्रतीच्या दुधाला ३२ रुपये प्रती लीटर एवढा भाव देण्यात येईल, असे गोकुळकडून सांगण्यात आले आहे. मागच्या सहा महिन्यांमध्ये गोकूळने दूध दरामध्ये तब्बल ५ रुपयांची वाढ केली आहे. याआधी १ ऑगस्टला गोकुळने म्हशीच्या दूध विक्री दरात २ रुपयांनी तर गायीच्या दूध विक्री दरात १ रुपयाची वाढ केली होती, त्यामुळे मुंबईत म्हशीच्या दुधासाठी ६६ रुपये मोजावे लागत होते. जनावरांसाठी वापरल्या जाणाऱ्या चाऱ्याच्या दरांमध्ये वाढ झाल्यामुळे दुधाचे दर वाढवण्यात आल्याचे ऑगस्टमध्ये झालेल्या दरवाढीवेळी गोकुळकडून सांगण्यात आले होते. ऑगस्ट महिन्यामध्ये अमूल आणि मदर डेअरीनेही दूध दरांमध्ये वाढ केली होती.
Join Our WhatsApp Community