महाराष्ट्र वन विभागाने सांगलीतील इस्लामपूर येथील स्थलांतरित ऊस कामगारांच्या वसाहतीतून एक सोनेरी कोल्हा (Golden Jackal) पकडला. निसर्ग संवर्धन सोसायटी (NECONS) या स्वयंसेवी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. हर्षद दिवेकर यांना शुक्रवारी सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी गावातील एका महिलेने दूरध्वनीद्वारे ही माहिती दिली.
या महिलेने स्वत:चे नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. यावेळी तिने डॉ. दिवेकर यांना सांगितले की, या कोल्ह्याला पकडून ऊस कापणी करणाऱ्यांच्या वस्तीत बांधून ठेवले आहे तसेच वस्तीतील लोकांनी त्याच्या गळ्याला दोरी बांधून त्याला फिरवत आहेत.
त्यानंतर ही महिला म्हणाली की, वन विभागाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र वन विभागाशी संपर्क होऊ शकला नाही. दिवेकर यांनी ताबडतोब ही माहिती सहाय्यक उपवनसंरक्षक (एसीएफ) अजित सजणे यांना दिली. त्यानंतर त्यांनी ताबडतोब इस्लामपूर वन विभागाला या माहितीची पडताळणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर वन रक्षकाने दिवेकर यांच्याशी संपर्क साधला आणि गोटखिंडी गावातील वस्तीत जाऊन दुर्मिळ सोनेरी कोल्ह्याला (golden jackal ) ताब्यात घेण्यात आले.
(हेही वाचा – World Cup 2023 Final : म्हणून रोहितला जिंकायचा आहे द्रविडसाठी वर्ल्ड कप )
वन परिसंस्थेतील महत्त्व…
वन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या सोनेरी कोल्ह्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला लवकरच त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल. ऊस कामगारांनी हा प्राणी कसा हस्तगत केला याचादेखील वन विभाग तपास करत आहे. गोल्डन जॅकल हे मूळचे भारतीय उपखंडातील असून वन परिसंस्थेत ते खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांना सर्वभक्षी म्हटले जाते, कारण ते विविध प्रकारचे लहान सस्तन प्राणी, पक्षी, मासे, ससे आणि फळेदेखील खातात. दुर्दैवाने, सोनेरी कोल्हे हे शिकार, वन्यजीव तस्करी, मानव-प्राणी संघर्ष आणि महामार्ग अपघातांचे वारंवार बळी पडतात. ही प्रजाती 1972 च्या वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची II अंतर्गत संरक्षित आहे आणि जंगलात त्यांची संख्या अंदाजे 80,000 च्या आसपास आहे.
हेही पहा –