कल्पवृक्ष मार्केटींग कंपनीने 14 लाख ठेवीदारांचे सुमारे 219 कोटी रुपये हडप केले होते. 2003 साली कल्पवृक्ष कंपनीने गाशा गुंडाळल्यापासून भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या ठेवीदारांना आता थोडा दिलासा मिळण्याच्या आशा जाग्या झाल्या आहेत. कंपनीची जप्त केलेली ठाण्यातील मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे द्यावेत, असा निर्णय ठाण्याचे तत्कालिन अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी 2004 मध्ये दिल्यानंतर उशिराने का होईना ठाणे जिल्हा प्रशासनाने 17 वर्षांनतर आता या कंपनीच्या 24 कोटी 48 लाख 46 हजार रुपयांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरु केली आहे.
लाखो ठेवीदारांना लुबाडले
1998 साली ठाण्यातील उमेश खाडे याने आकर्षित व्याजाचे आमिष दाखविणा-या कल्पवृक्ष मार्केटिंग कंपनीचा स्थापना केली होती. सहा ते सात वर्षात या कंपनीने राज्यातील लाखो ठेवीदारांकडून तब्बल 588 कोटींची गुंतवणूक जमा केली होती. त्यापैकी 297 कोटी रुपये व्याजासह कंपनीने परत केले आहेत.
लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु
मात्र, 2003 साली ठेवीदारांचे हितसंबंध आणि संरक्षणासाठी एमपीआयडी हा विशेष कायदा केला होता. मात्र, असा कायदा करण्याचा हक्क राज्य सरकारला नसल्याने सांगून न्यायालयाने तो 2005 साली रद्द केला होता. त्यामुळे कंपनीची जप्त केलेली मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळविण्यात अडथळा निर्माण झाला होता. परंतु, सर्वाच्च न्यायालयाने या कायद्याला संमती दिल्यानंतर गुंतविलेले पैसे परत मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला होता. तेव्हापासून ठेवीदारांचा भरपाईसाठी वेगवेगळ्या व्यासपीठांवरुन पाठपुरावा सुरु होता. ठाणे न्यायलयाने 2004 साली दिलेल्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी ठाण्यातील सात मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
( हेही वाचा: परवानगी नाही तरी हजारो मुसलमान एमआयएमच्या मोर्चासाठी मुंबईच्या दिशेने )
Join Our WhatsApp Community