रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑफलाइन तिकीट बुक करण्यासाठी आता तुम्हाला रेल्वे स्टेशनवर जाऊन लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही. तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ट्रेनचे तिकीट बुक करू शकता. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधा आणि गरजा लक्षात घेऊन पोस्ट ऑफिसमधून रेल्वे तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
पोस्ट ऑफिसमध्ये तिकीट आरक्षण सुविधा
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) या रेल्वे तिकीट बुकिंग कंपनीने या विशेष सुविधेसाठी पुढाकार घेतला आहे. ही सुविधा रेल्वेच्या आधुनिकीकरण योजनेचा एक भाग आहे ज्या अंतर्गत रेल्वे टपाल विभागाच्या मदतीने पोस्ट ऑफिसमध्ये ट्रेन आरक्षण सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
( हेही वाचा : राज्यात दारू, वाईन शॉप होणार बंद? काय म्हणाले आरोग्यमंत्री टोपे )
प्रवाशांना फायदा
भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सर्वात आधी ही सुविधा उत्तर प्रदेश राज्यात सुरू केली जाणार आहे. याठिकाणी सुमारे ९ हजार १४७ पोस्ट ऑफिसमध्ये तिकीट आरक्षण सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. यामुळे लोकांचा बराच वेळ वाचेल कारण, प्रवाशांना त्यांचे रेल्वे तिकीट काढण्यासाठी स्टेशनवर किंवा एजंटकडे जावे लागणार नाही. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर प्रदेश राजधानी लखनऊमध्ये इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC)च्या या नवीन सुविधेचे अनावरण केले. रेल्वेच्या या विशेष सेवेचा सर्वाधिक फायदा गावकऱ्यांना होणार आहे.
Join Our WhatsApp Community