उत्तर गोव्यातील बहुप्रतिक्षित मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारपासून सुरु झाले आहे. मोपा विमानतळावर पहिले इंडिगो कंपनीचे विमान उतरले आहे. हैद्राबाद-गोवा ही पहिली व्यावसायिक फ्लाईट विमानतळावर उतरली. यावेळी विमानातील प्रवाशांचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले.
( हेही वाचा : केंद्राकडून राज्याला नववर्षाचे गिफ्ट! विविध योजनांसाठी ५०० कोटी मंजूर )
हैद्राबादवरून 7.40 वाजता निघालेले हे विमान मोपा येथील मनोहर विमानतळावर 8.40 वाजता पोहोचले. या विमानाने हैद्राबाद ते गोवा अंतर 1 तासांत पूर्ण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी या विमानतळाचे उद्घाटन केले होते. उत्तर गोव्यातील मोपा येथे असलेले हे विमानतळ सुरू झाल्याने केवळ गोवाच नव्हे तर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही जिल्ह्यांनाही यामुळे चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या विमानतळावरून विमान कंपनी इंडिगोने देशातील 8 शहरांसाठी उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये देशाची राजधानी दिल्लीचाही समावेश आहे. यामुळे उत्तर गोव्यातील पर्यटन व्यवसायाला आणखी भरारी येण्याची शक्यता आहे.
इंडिगोने मोपा विमानतळावरून 168 साप्ताहिक उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही उड्डाणे हैदराबाद, दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, पुणे, जयपूर आणि अहमदाबादसाठी असणार आहेत. गुरूवारपासून ही उड्डाणे सुरू झाली. गोव्याचे पहिले विमानतळ दक्षिण गोव्यातील दाभोळी येथे आहे. चापोरा किल्ला, वागेटर बीच, अंजुना बीच, फोर्ट अगुआडा, बागा बीच, कडोलिम बीच, कलंगुट बीच, सिंक्वेरिम बीच, रेस मॅगोस फोर्ट, बॅसिलिका ऑफ बॉम जीझस, द चर्च ऑफ अवर लेडी ऑफ इमॅक्युलेट कॉन्सेप्शन यासारखी गोव्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे फक्त गोव्यात आहेत. नवे विमानतळ सुरू झाल्यामुळे पर्यटकांना खूप सोयीसुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.
Join Our WhatsApp Community