पक्षीप्रेमींसाठी आनंदाची बातमी; पाणपक्ष्यांना खुणावतेय सोलापूरातील उजनी धरणातील जैवविविधता

154

देशपातळीवर ४८ पाणथळ जमिनींचे संवर्धन करण्याचा केंद्रीय पर्यावरण,वने आणि वातावरणीय बदल या विभागाने निर्णय घेतल्यानंतर राज्यातील पाणथळ जमिनीतील जैवविविधतेबाबत मोठी सकारात्मक बाब समोर आली आहे. मंत्रालयाने देशपातळीवर २० पाणपक्ष्यांच्या अधिवास जपण्यासाठी उपाययोजना करण्याचे निश्चित केले होते. २० पाणपक्ष्यांपैकी ८ पक्ष्यांच्या प्रजाती महाराष्ट्रात आढळल्या असून, त्यापैकी नदी सुरय (इंग्रजी भाषेत ‘रिव्हर टर्न’ ) या पक्ष्यासह ५८ पाणपक्ष्यांच्या प्रजाती उजनी धरणात आढळल्या आहेत. तब्बल २० हजार ९७७ पाणपक्ष्यांची संख्या एकट्या उजनी धरणातील परिसरात आढळली.

आंतरराष्ट्रीय पातळीवर मध्य आशिया विभागातून आकाशामार्गे प्रवास करणा-या पक्ष्यांच्या संवर्धनाचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चिला जात आहे. या चर्चेच्या माध्यमातून राज्यातील ४८ पाणथळ जमिनींचे संवर्धन करण्याबाबत केंद्रीय पातळीवर एकमत झाले. त्यात महाराष्ट्रातील नाशिक येथील नांदूरमधमहेश्वर, गंगापूर, जायकवाडी तसेच ठाणे खाडीतील पाणथळ जमिनींच्या संवर्धनात्मक उपाययोजनांना प्राधान्यक्रम दिले गेले. पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी आखलेल्या राष्ट्रीय कृती आराखड्यातील भाग म्हणून राज्यात पाणथळ जागांच्या अधिवासांचा अभ्यास करण्यात आला. वनविभागाच्या कांदळवन कक्ष तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या पर्यावरणप्रेमी संस्थेने राज्यातील सहा पाणथळ जमिनींमध्ये दिसून येणा-या पाणथळ पक्ष्यांचा अभ्यास केल्यानंतर ही माहिती समोर आली.

( हेही वाचा: आरेत बिबट्याचा पुन्हा हल्ला )

उजनी धरणात टिकाव धरुन आहे पाणथळ पक्ष्यांचा अधिवास

राज्यात पक्षीतज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासात नदी सुरय या पक्ष्याची संख्या मोठ्या प्रमाणात उजनी धरण आणि जायकवाडी परिसरात दिसून आली. हा पक्षी देशात प्रजनन तसेच अंडी घाल्यानंतर आशियातील इतर देशांमध्ये काही काळासाठी स्थलांतर करतो. शेजारच्या पाकिस्तान, नेपाळ, भूतान, इंडोनेशिया या देशात त्याचा काही काळ संचार असतो. मार्च ते मे महिना नदी सुरय पक्ष्याचा प्रजनन काळ समजला जातो. राज्यात जुलै महिन्यापर्यंत या पक्ष्यांचा प्रजनन काळ सुरु असल्याचे शास्त्रज्ञांनी निरीक्षण नोंदवले. उजनी धरणात ३०६ नदी सुरय पाणपक्ष्यांची संख्या आढळली तर जायकवाडीत २५९ नदी सुरय पाणपक्षी आढळले. एप्रिल २०२२ मध्ये उजनी धरणातून सर्वाधिक ५८ पाणपक्ष्यांच्या प्रजाती तर तब्बल २० हजार ९७७ पाणपक्ष्यांची नोंद झाली.

राज्यातील या सहा प्रमुख पाणथळ जागांमध्ये होणारे संवर्धन –

नाशिकमधील नांदूरमधमेश्वर अभयारण्य (रामसर जागा), औरंगाबादमधील जायकवाडी पक्षी अभयारण्य, नाशिकमधील गंगापूर धरण, सोलापूरमधील उजनी धरण, जळगावमधील हातनूर धरण, अहमदनगरमधील विसापूर धरण

 ८ प्रमुख पाणथळ पक्ष्यांच्या नोंदी –

मोठा रोहित पक्षी (फ्लेमिंगो), नयनसरी बदक, छोटी लालसरी, बाकचोच तुतारी, छोटा टिलवा, नदी सुरय तसेच काळ्या शेपटीचा पंकज (मळगुजा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.