सर्व मुंबईकर नागरिकांना कोविड-१९ प्रतिबंधक लस देण्यासाठी मुंबई महापालिकेने जागतिक स्तरावर प्रसिद्धीस दिलेल्या लस पुरवठा स्वारस्य अभिव्यक्तीस(Expression of Interest), बुधवारी आणखी ३ संभाव्य पुरवठादारांचा प्रतिसाद लाभला आहे. यामुळे एकूण संभाव्य पुरवठादारांची संख्या ८ इतकी झाली आहे. नव्याने आलेल्या पुरवठादारांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार असून, त्यामुळे या स्वारस्य अभिव्यक्तीस मंगळवार १ जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या लसींचा करणार पुरवठा
मुंबई महापालिकेकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावातील ८ संभाव्य पुरवठादारांपैकी ७ पुरवठादारांनी स्पुतनिक फाईव्ह तर त्यातीलच एका पुरवठादाराने स्पुतनिक लाईट या कोविड लसींचा पुरवठा करण्यास स्वारस्य दाखविले आहे. तर उर्वरित एका पुरवठादाराने अॅस्ट्राझेनका फाईजर या लसीचा पुरवठा करण्यात स्वारस्य दाखवले आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या निर्देशानुसार उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे व सहकारी अधिकारी कोविड लस पुरवठा उपलब्ध करुन घेण्याबाबतची ही कार्यवाही पार पाडत आहेत.
(हेही वाचाः लसींच्या पुरवठ्यासाठी महापालिकेकडे तीन कंपन्यांचे प्रस्ताव! कोणत्या आहेत त्या कंपन्या?)
दिली होती मुदतवाढ
मुंबई महापालिकेला कोविड लस पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने जागतिक स्तरावर १२ मे २०२१ रोजी स्वारस्य अभिव्यक्ती प्रकाशित केली. त्यानंतर १८ मे २०२१ च्या मुदतीत एकूण ५ संभाव्य पुरवठादारांचे प्रस्ताव प्राप्त झाले. परंतु, प्राप्त प्रस्तावातील कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी या स्वारस्य अभिव्यक्तीला मुदतवाढ देणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार बुधवारी २५ मे २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. बुधवारी आणखी ३ संभाव्य पुरवठादारांनी प्रस्ताव सादर केले. मात्र, त्यांच्यादेखील काही कागदपत्रांची पूर्तता होणे आवश्यक आहे.
प्रशासन करत आहे बारकाईने अभ्यास
विशेषतः लस पुरवठा करण्यास इच्छुक असलेले पुरवठादार आणि प्रत्यक्ष लस उत्पादित करत असलेल्या कंपन्या यांच्यादरम्यान असलेले व्यावसायिक संबंध पडताळून पाहणे अत्यावश्यक आहे. जेणेकरुन लस पुरवठा हा दिलेल्या मुदतीत आणि सुरळीपणे होईल, याची खात्री पटेल. त्यासोबत नेमक्या किती दिवसांत लस पुरवठा होईल, किती संख्येने लस साठा पुरवला जाईल, लसीचे दर व रक्कम अधिदान करण्याच्या अटी व शर्ती या ४ मुख्य पैलूंचा अतिशय बारकाईने अभ्यास करुन, महापालिका प्रशासन कोविड प्रतिबंधक लस साठा उपलब्ध करण्याविषयी सातत्याने पाठपुरावा करत आहे.
(हेही वाचाः रेल्वे स्थानकांवर एकही प्रवासी नाही विनामास्क?)
कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश
मंगळवारी एका संभाव्य पुरवठादाराबरोबर महापालिका प्रशासनाने दृकश्राव्य प्रणालीद्वारे चर्चा केली. त्यानंतर बुधवारी २५ मे २०२१ सकाळी ४ संभाव्य पुरवठादारांसोबत दृकश्राव्य प्रणालीद्वारे चर्चा करण्यात आली. स्वारस्य अभिव्यक्तीची आजची मुदत संपुष्टात येत असतानाच नव्याने ३ प्रस्ताव प्राप्त झाल्याने, तसेच त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता होणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आल्याने मंगळवार दिनांक १ जून २०२१ पर्यंत स्वारस्य अभिव्यक्तीला मुदतवाढ देणे आवश्यक ठरले आहे. मात्र, आता दिनांक १ जून २०२१ पर्यंतच्या मुदतीत कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. तसेच आणखी कोणाला प्रस्ताव सादर करावयाचा असल्यास संपूर्ण कागदपत्रांसोबतच पूर्ण प्रस्ताव सादर करावा लागणार आहे.
सर्व संभाव्य पुरवठादारांनी तातडीने कागदपत्रांची पूर्तता करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. सर्व प्रस्तावांची कागदपत्रांसह पूर्ण छाननी करुन महापालिका प्रशासनाकडून वाटाघाटी करण्यात येत आहे. अधिकाधिक प्रस्ताव प्राप्त होत असल्याने स्पर्धात्मक व वाजवी पद्धतीने ही सर्व कार्यवाही पूर्ण करता येणार आहे.
Join Our WhatsApp Community