अकोला रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या मालगाडीचा मोठा अपघात टळला. बडनेराकडून भुसावळकडे जाणाऱ्या मालगाडीचे २८ डब्बे गाडीपासून वेगळे झाल्याने रेल्वे वाहतुकीचा तब्बल एक तास खोळंबा झाला होता. न्यू तापडियानगर रेल्वे फाटकाजवळच गाडीचे डब्बे वेगळे झाल्याने फाटक तासभर बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे अकोट, दर्यापूरकडे जाणारी रस्ता वाहतूकही खोळंबली होती.
अकोला रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या न्यू तापडियानगर रेल्वे फाटकाजवळ बुधवार सकाळच्या सुमारास ही घटना घडली. डबल रेक असलेल्या या मालगाडीला ११० डब्बे होते. दगडी कोळसा वाहतूक करणारी गाडी बडनेरा येथून भुसावळकडे निघाली होती. मूर्तिजापूर रेल्वे स्थानक क्रॉस केल्यानंतर अकोल्याकडे भरधाव निघालेल्या मालगाडीचे अकोला रेल्वे स्थानकाजवळ पोहोचल्यानंतर कपलिंग तुटले. त्यामुळे गाडीपासून २८ डब्बे वेगळे झाले.
सुदैवाने एअर ब्रेक असल्यामुळे वेगळे झालेले डब्बे जाग्यावरच थांबल्याने मोठा अपघात टळला. कपलिंग तुटून डब्बे वेगळे झाल्याची बाब गाडीचे गार्ड रज्जाक यांच्या लक्षात येताच त्यांनी चालकासोबत संपर्क साधला. डबल रेक गाडी असल्याने उर्वरित डब्ब्यांसह गाडीचे इंजन रेल्वे स्थानकावर पोहोचले होते. गाडी थांबवून डब्बे जोडण्यासाठी रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तब्बल एका तासाच्या प्रयत्नानंतर दुपारी १२.१७ मिनिटांनी मालगाडी मागे आणून तुटलेले कपलिंग जोडण्यात आले. त्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली. यादरम्यान भुसावळकडून बडनेरा व बडनेराकडून भुसावळकडे जाणाऱ्या अप-डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबविण्यात आली होती. याच वेळात गितांजली एक्स्प्रेस अकोला रेल्वे स्थानकावरून जाते. त्यामुळे या गाडीलाही विलंब झाला होता. सुदैवाने या घटनेत कोणताही मोठा अपघात घडला नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सुटकेचा निश्वास घेतला.
(हेही वाचा – रुग्णालयांतील मोफत उपचारांच्या खाटांची माहिती मिळणार एका क्लिकवर)
Join Our WhatsApp Community