Goregaon Mulund Link Road : गोरेगाव मुलुंड जोड रस्ता : कास्टींग यार्ड बनणार २५ किलोमीटर लांब, खर्च वाढला १३२ कोटींनी

या प्रकल्पांतर्गत गोरेगावमधील चित्रनगरी ते पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड येथे खिंडीपाडा पर्यंत  दोन समांतर भूमिगत बोगदे बांधण्यात येणार आहेत

199
Goregaon Mulund Link Road : गोरेगाव मुलुंड जोड रस्ता : कास्टींग यार्ड बनणार २५ किलोमीटर लांब, खर्च वाढला १३२ कोटींनी
Goregaon Mulund Link Road : गोरेगाव मुलुंड जोड रस्ता : कास्टींग यार्ड बनणार २५ किलोमीटर लांब, खर्च वाढला १३२ कोटींनी

विशेष प्रतिनिधी,मुंबई

पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडण्यासाठी  मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (Goregaon Mulund Link Road) प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पांतर्गत गोरेगावमधील चित्रनगरी ते पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड येथे खिंडीपाडा पर्यंत  दोन समांतर भूमिगत बोगदे बांधण्यात येणार आहे. या प्रकल्प कामांसाठी विविध करांसह १२ हजार १३ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.  या कामांसाठी जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड अँड नागार्जुन कस्ट्रक्शन कंपनी ही संयुक्त भागीदारीतील कंपनी पात्र ठरली आहे.  मात्र, या कामांमध्ये कास्टींग यार्डसाठीच १३२ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च होणार आहे. आरेच्या जंगलातून ही बोगदा जात असल्याने याचे कास्टींग यार्ड हे २५ किलोमीटर लांब निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या कास्टींग यार्डमुळे या प्रकल्पाचा खर्च विविध करांसह १३२ कोटी रुपयांनी वाढला आहे.

सध्या पूर्व द्रुतगती महामार्गापासून ते खिंडीपाडा जंक्शन (अमर नगर, मुलुंड) आणि पश्चिम द्रुतगती मार्गापासून चित्रनगरी (गोरेगाव) दरम्यानच्या या प्रकल्पांतर्गत रस्त्याची विविध कामे प्रगतिपथावर सुरु आहेत. चित्रनगरी (फिल्म सिटी)  ते खिंडीपाडा जंक्शन या टप्प्या दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याचा भाग असल्याने, हा टप्पा (मिसिंग लिंक) जोडण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने सविस्तर अभ्यास  करण्यात आला होता. त्याच्या निष्कर्षानुसार हा टप्पा समांतर अशा जुळ्या आणि पूर्णपणे जमिनीखालून जाणाऱ्या अर्थात भूमिगत बोगद्याच्या माध्यमातून जोडण्याचे निश्चित करण्यात आले. (Goregaon Mulund Link Road)

प्रत्येकी तीन मार्गिका असणाऱ्या या जुळ्या बोगद्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर मागवलेल्या या निविदेत जे. कुमार- नागार्जुन कंस्ट्रक्शन कंपनी अर्थात एनसीसी जेव्ही, एल ऍण्ड टी आणि ऍफकॉन्स अशा तीन कंपन्यांनी निविदा स्पर्धेत भाग घेतला होता. यातील जेकुमार-एनसीसी या संयुक्त भागीदार कंपनीने  सर्वांत कमी बोली लावली आहे. ही बोली ६ हजार ३०१ कोटी रुपयांची असून विविध करांसह बांधकाम, देखभाल आणि मलबा विल्हेवाट आदींचा एकूण  खर्च १२,०१३. ४१ कोटी रुपये आहे.

(हेही वाचा-Kareena Shaikh : लेडी डॉन करीना शेखला दरोड्याप्रकरणी अटक )

एकमेकांना समांतर असे दोन समांतर बोगदे प्रत्येकी ४.७० किलोमीटरचे असतील. संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य परिसरात त्याचा अंतर्गत व्यास १३ मीटरचा असेल. हा बोगदा अभयारण्याच्या डोंगराच्या खाली पूर्णपणे जमिनीखालून जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा बोगदा पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. कारण संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातील वन्यजीवन, जलाशय, वृक्षसंपदा यांना कोणतीही बाधा पोहोचणार नाही. कोणतेही भूसंपादन करावे लागणार नाही. या बोगद्यामध्ये हवा खेळती ठेवण्यासाठी यंत्रणा, आग प्रतिबंधात्मक अद्ययावत यंत्रणा, तसेच पाणीपुरवठा, पर्जन्य जलवाहिन्या आणि इतर संस्थांच्या वाहिन्याही विकसित करण्यात येतील.

हा संपूर्ण बोगदा टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) च्या माध्यमातून खणला जाईल. या प्रकल्पासाठी पर्यावरणीय आणि वन विभागाच्या सर्व आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या आहेत. या संपूर्ण बोगदा साकारण्याचा कालावधी एकूण ६० महिन्यांचा म्हणजेच ५ वर्षांचा अपेक्षित असून बोगद्याच्या कामाला ऑक्टोबर २०२३ पासून सुरुवात केली जाईल, असा अंदाज अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी व्यक्त केला आहे. चित्रनगरीतून जाणाऱ्या या बोगदा प्रकल्पाचे काम प्राण्यांच्या नैसर्गिक वावराला कुठेही बाधा न आणता सुरक्षितपणे केले जाणार असल्याचेही त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

मात्र, या प्रकल्पाकरता कंत्राटदाराने कास्टींग यार्ड करता प्रकल्पाच्या क्षेत्रात २५ कि.मी अंतरावर १० हेक्टर जमीन भाडेतत्वावर घेऊन उभारण्यात येणार आहे. यासाठी २७५ रुपये प्रती चौरस फूट याप्रमाणे भाडे आकारण्यात येणार असून पुढील चार वर्षांकरता यासाठी १३२ कोटी रुपयांचा खर्च कंत्राटदाराने नमुद केला आहे. या प्रकल्पाच्या क्षेत्रामध्ये जागेच्या अभावामुळे जागा मिळू शकत नाही. त्यामुळे कास्टींग यार्ड हे प्रकल्पाच्या जागेपासून २५ कि.मी पेक्षा जासत अंतरावर घेण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे कंत्राटदाराने नमुद केले आहे. त्यामुळे कंत्राटदाराला काँक्रिट सेगमेंटच्या वाहतुकीकरता जास्त किंमत मोजावी लागणार आहे.

या कामासाठी १४.७ मीटर व्यासाचे दोन खोदाई यंत्रे व त्यासाठी लागणारी सामग्री लागणार आहे. ही सामग्री मुंबई पोर्ट ट्रस्टपासून प्रत्यक्ष साईटपर्यंत आणण्यासाठी विशेष वाहनांची सोय करावी लागणार आहे व या खोदाई यंत्राच्या वाहतुकीच्या व्यवस्थेसाठी अतिरिक्त खर्च लागणार आहे. तसेच हा प्रकल्प संजय गांधी राष्ट्रीय उदयानाच्या शेजारी असल्याने या कामात भूस्फोटकांचा वापर करता येणार नाही व त्यासाठी महागड्या खोदाई तंत्राचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळेही या प्रकल्पाचा खर्च अधिक वाढल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.