राज्यात १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरु केले आहे. मात्र, लसींचा तुटवडा आणि त्यातून केंद्रांवर होणारा गोंधळ लक्षात घेता आता १८ ते ४४ या वयोगटासाठीचे वर्गीकरण (स्लाॅट) करून लस टोचण्याचा मानस आहे. हे वर्गीकरण वयोगट किंवा सहव्याधीनुसार असेल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. शुक्रवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लसींचा साठा अपुरा असल्यामुळे केंद्रांवर लसींचा तुटवडा आहे. या पार्श्वभूमीवर १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य सरकारने मोजक्या केंद्रांवरच लसीकरण सुरू केले आहे. मुंबईत आठ केंद्रे आहेत. परिणामी या केंद्रांवर नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे.
सहव्याधी असलेल्यांना अधिक प्राधान्य देता येईल!
ग्रामीण भागातल्या केंद्रांवर शहरांमधून ज्यांना तंत्रज्ञानाची जाण आहे अशा लोकांनी कोविन अॅपवर नोंदणी करून केंद्रांवर जाऊन लसीकरण करून घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात अस्वस्थता निर्माण झाली. मुख्यमंत्र्यांशी मी बोललो. ही समस्या सोडवण्यासाठी लस मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आपल्याला वर्गीकरण करावे लागणार आहेत. मग वयोगटाचा किंवा सहव्याधीप्रमाणे विभागणी करता येईल. म्हणून ३५ ते ४४ या वयोगटातल्या लोकांना प्राधान्य देता येईल का? त्यातही सहव्याधी असलेल्यांना अधिक प्राधान्य देता येऊ शकेल, असे टोपे यांनी सांगितले.
(हेही वाचा : २१० एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर परिवहन मंत्री म्हणतात, आता लस द्या! )
ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी राज्यात ३८ पीएसए प्लांट लवकरच!
राज्यात लसीचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी रशियाची स्पुटनिक लस मागवण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राजेश टोपेंनी यावेळी दिली. रशियाची स्पुटनिक व्ही लस महाराष्ट्रात मागवण्यासाठी चर्चा सुरू आहे. त्यांच्याशी लसीच्या दरांबाबत बोलणी सुरू आहेत, असे ते म्हणाले. ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी राज्यात ३८ पीएसए प्लांट लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्याने १ कोटी ७३ लाख २१ हजार ०२९ लोकांचे लसीकरण केले आहे. १८ ते ४४ या वयोगटासाठी राज्याने २ लाख १५ हजार २७४ लोकांचचे लसीकरण केले आहे. २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. ही देशात सर्वाधिक संख्या असल्याचा दावा टोपे यांनी केला.
राज्यात ३८ पीएसए प्लांट कार्यान्वित केले
हवेतून ऑक्सिजन निर्मितीसाठी राज्यात ३८ पीएसए प्लांट कार्यान्वित केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्लांटच्या १५० हून जास्त निविदा काढल्या आहेत. यातून ९५ ते ९८ टक्के शुद्धतेचा दैनंदिन ५३ मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकतो. यामुळे लिक्विड ऑक्सिजनची मागणी कमी होऊ शकते, असे टोपे यावेळी म्हणाले. आरोग्य विभागातील १६ हजार कर्मचाऱ्यांची लवकरच भरती करण्यात येणार असून आंतरराष्ट्रीय निविदेच्या माध्यमातून ३ लाख रेमडेसिवीर लवकरच प्राप्त हाेणार असल्याची माहिती टाेपे यांनी दिली.
बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स
तिसऱ्या लाटेत १८ वर्षे वयाच्या आतील मुलांना कोरोना संसर्गाचा अधिक धोका आहे. त्याची तयारी राज्याने चालवली असून आपण लवकरच बालरोग तज्ज्ञांचा राज्य टास्क फोर्सचे गठन करणार आहोत. लहान मुलांचे खाटा, त्यांचे अतिदक्षता विभाग, व्हेंटलेटर्स, उपचारपद्धती यासंदर्भात या टास्क फोर्सचे मार्गदर्शन घेतले जाईल, असे मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community