होळीपूर्वी केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा; ‘या’ डाळी होणार स्वस्त

113

होळीच्या आधीच सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्‍या तूर डाळीवरील आयात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बाजारात उपलब्ध असलेल्या डाळींच्या किमतीत घट होणार आहे. होळीपूर्वीच केंद्र सरकारने हा निर्णय घेऊन महागाईत काहीसा दिलासा देण्याचे काम केले आहे. आता देशभरात तूर डाळी आयात करण्यासाठी व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे आयात शुल्क भरावे लागणार नाही. परंतु, संपूर्ण तूर डाळी व्यतिरिक्त पूर्वीच्या तूर डाळीवर १० टक्के मूळ आयात शुल्क लागू असेल.

आतापर्यंत सरकारने संपूर्ण तूर डाळीवर १० टक्के आयात शुल्क लावले होते, ते आता पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ३ मार्च २०२३ रोजी संपूर्ण तूर डाळीवरील शुल्क हटवण्याचा आदेश जारी केला आहे. हा आदेश ४ मार्चपासून लागू झाला आहे. म्हणजे सणांपूर्वी स्वस्तात डाळ खरेदी करण्याची संधी मिळाली आहे. तूर डाळीचे भाव घसरल्याने महागाईचे चटके सहन करणाऱ्या जनतेला आता मोठा दिलासा मिळला आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये केंद्र सरकारने तूर डाळीबाबत आदेश जारी केला होता. या आदेशात सरकारने म्हटले होते की, ‘तूर डाळीच्या व्यापाऱ्यांना त्यांच्या देशातील साठ्याची प्रत्येक माहिती राज्य सरकारला द्यावी लागेल. तुमच्याकडे असलेला साठा अन्नधान्य महामंडळाच्या (FCI) पोर्टलवर नियमितपणे घोषित करावा लागेल. यासोबतच सर्व राज्यांचे सरकार त्यावर लक्ष ठेवणार आहे. त्यामुळे डाळींचा काळाबाजार आणि वाढत्या किमतीला आळा बसेल.’

(हेही वाचा – अमरावती-मुंबई एक्स्प्रेस प्रवास १५ जूनपासून महागणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.