बदलापूरच्या घटनेनंतर राज्यातील आश्रमशाळांमध्ये CCTV बसवण्याचा सरकारचा आदेश; त्यासाठी बनवली कार्यपद्धत

CCTV कॅमेरा फुटेजची तपासणी आठवड्यातून किमान तीन वेळा करणे आवश्यक राहील. मुख्याध्यापकाच्या देखरेखीखाली फुटेज तपासण्यात यावे. त्यांच्या समवेत अधीक्षक/अधीक्षिका तसेच दोन शिक्षक (महिला व पुरुष) यांनी असणे बंधनकारक, असे या आदेशात म्हटले आहे.

90

बदलापूरमध्ये चिमुकलीवर कंत्राटी कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली. त्यानंतर सरकारने शाळांसाठी मार्गदर्शक तत्वे आखून दिली. त्याचप्रमाणे आता राज्यातील आश्रमशाळांसाठीही मार्गदर्शक तत्वे आखून देण्यात आली आहेत, असा शासन निर्णय निर्गमीत करण्यात आला आहे. त्यामध्ये आश्रमशाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्याचा आणि त्यासंबंधी कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

काय म्हटले जीआरमध्ये? 

शाळा, वसतिगृहे येथील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याबाबत यापूर्वी सूचित केले आहे. अद्याप CCTV  कॅमेरा बसविण्यात आला नसल्यास या शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढील १५ दिवसांच्या कालावधीत बसविण्यात यावा. यासाठी शाळा व वसतिगृह प्रवेशद्वार, मैदान, वर्गखोल्या, स्वच्छतागृहाकडे जाणारी वाट, भोजनालय, पायऱ्या, कार्यालय, वाचनालय, प्रयोगशाळा, इ. ठिकाणी सर्व क्षेत्राचा आवाका सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या दृष्टीक्षेपात येईल अशा पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक राहील असे नियोजन करावे. या तरतुदीचे पालन न करणाऱ्या शाळांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

CCTV कॅमेरे बसविल्यानंतर संबंधित प्रकल्प अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना तसा अहवाल सादर करावा. यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असल्यास ते सुस्थितीत असल्याबाबत दक्षता घ्यावी. ते नादुरुस्त असल्यास त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, शासकीय आश्रमशाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तसेच आवश्यकतेप्रमाणे दुरुस्ती करावयाची असल्यास तसा प्रस्ताव अपर आयुक्त, आदिवासी विकास यांच्यामार्फत आयुक्तालयाकडे पाठविण्यात यावा. त्याप्रमाणे आयुक्तालयाने विहित कार्यपद्धती अवलंबून सीसीटीव्ही कॅमेरे सबंधित आश्रमशाळांना उपलब्ध करून द्यावेत.

अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य निवासी शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसविणे / आवश्यकतेप्रमाणे दुरुस्ती करावयाची असल्यास याबाबत होणारा खर्च, अनुदानित आश्रमशाळेमध्ये आकस्मिक खर्च अनुदानातुन तसेच एकलव्य निवासी आश्रमशाळाच्या बाबत केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीमधून भागविण्यात यावा. शाळा व परिसरात केवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे पुरेसे नसून, ठराविक अंतराने त्याचे फुटेज तपासणे देखील आवश्यक आहे. असे फुटेज तपासणे व काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी विशेषत्वाने मुख्याध्यापकाची व सर्वसाधारणपणे शाळा व्यवस्थापन समितीची असेल.

(हेही वाचा Dnyanesh Maharao यांच्याकडून श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्यावर अश्लील टीका; कोल्हापुरात धार्मिक भावना दुखावल्याचा गंभीर गुन्हा दाखल

CCTV कॅमेरा फुटेजची तपासणी आठवड्यातून किमान तीन वेळा करणे आवश्यक राहील. मुख्याध्यापकाच्या देखरेखीखाली फुटेज तपासण्यात यावे. त्यांच्या समवेत अधीक्षक/अधीक्षिका तसेच दोन शिक्षक (महिला व पुरुष) यांनी असणे बंधनकारक. याबाबत शाळेमध्ये कंट्रोल रुम असावी. फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास याबाबत चौकशी करून प्रकल्प अधिकारी तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची राहील.

अचानक एखादी बाब उद्भवल्यास तात्काळ संपर्क करता यावा तसेच मदत मागता यावी यासाठी वसतिगृहाच्या आणि शाळेच्या प्रत्येक मजल्यावर बेल असावी आणि ती चालु स्थितित असल्याची खात्री करुन घंटेचा आवाज श्री-अधिक्षिका व मुख्याध्यापक यांच्या कक्षापर्यंत जाईल अशा रितीने बसवुन घ्यावी.

शाळेतील शिक्षकेतर कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना काळजी घेणे व कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे यासाठी देखील उपाययोजना करणे आवश्यक आहे. नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच बाह्यस्रोताद्वारे अथवा कंत्राटी पध्दतीने ज्या नेमणुका केल्या जातात त्या बाबतीत संबंधित व्यक्तीच्या पार्श्वभूमीची काटेकोर तपासणी शाळा व्यवस्थापनामार्फत होणे आवश्यक आहे. यासाठी नेमणुकीपूर्वी चारित्र्य पडताळणी अहवाल स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत प्राप्त करून घेणे आवश्यक राहील. नेमणुकीनंतर संबंधित व्यक्तीच्या छायाचित्रासह त्याची सर्व तपशीलवार माहिती स्थानिक पोलीस यंत्रणेकडे देण्यात यावी.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.