अभियांत्रिकी प्रवेशासाठी सरकारने कोणता केला महत्वाचा बदल? वाचा… 

अभियांत्रिकी प्रवेशासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या अनिवार्य विषयासह गणित किंवा जीवशास्त्र यांपैकी एक विषय घेऊन इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असणे, अशी अट होती, ती रद्द करण्यात आली आहे. 

110

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक पात्रतेत बदल करण्यात आले आहे. निश्चित केलेल्या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात दिली.

यापुढे पीसीएम/पीसीबी सक्तीची नाही! 

यापूर्वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या अनिवार्य विषयासह गणित किंवा जीवशास्त्र (पीसीएम/पीसीबी) यांपैकी एक विषय घेऊन इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असले पाहिजे, अशी अट होती. ती आता बदलून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या इ. बारावीमध्ये भौतिकशास्त्र/ गणित/रसायनशास्त्र/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/जीवशास्त्र/इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिस / बायोटेक्नॉलॉजी / टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट / ॲग्रिकल्चर/ अभियांत्रिकी ग्राफिक्स/बिझनेस स्टडीज/ एंटरप्रीनरशिप या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झाले असल्यास अशा विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक वादग्रस्त सीमाक्षेत्रातील उमेदवारांना प्रवेश

सामंत म्हणाले, महाराष्ट्र-कर्नाटक वादग्रस्त सीमाक्षेत्रातील उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरताना संबंधित “उमेदवार विवादित सीमा क्षेत्रामधील आहे”, असा उल्लेख असणारे प्रमाणपत्र जोडावे लागत होते. अशा उमेदवारांना वरील प्रमाणपत्र कर्नाटक राज्यातील सक्षम अधिकाऱ्यांकडून प्राप्त करुन घेताना “विवादित सीमा क्षेत्रामधील” या शब्दामुळे अडचणी येत होत्या. आता शासनाने या प्रमाणपत्रातील “विवादित” (Disputed) शब्द काढून टाकलेला आहे. त्यामुळे सीमा भागातील विद्यार्थ्यांस प्रवेश घेणे सोपे होणार आहे.

(हेही वाचा : जयंत पाटील कर्नाटकाला विश्वासात घेतील का?)

काश्मिरी पंडित/काश्मिरी हिंदू कुटुंबातील पाल्यांचा पदविका प्रवेश

पदविका शिक्षण संस्थांमध्ये काश्मिरी विस्थापितांबरोबरच, काश्मीरमधून विस्थापित न होता काश्मीर खोऱ्यांमध्ये राहत असलेल्या काश्मिरी पंडित / काश्मिरी हिंदू कुटुंबे (निवासी) आणि ज्यांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र आहे. अशा उमेदवारांना प्रवेशासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत.

ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या जागांबाबत…

पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या ज्या प्रथम वर्षाच्या आर्थिक मागास प्रवर्गासाठी (ईडब्ल्यूएस) आरक्षित जागा रिक्त राहतील अशा जागा दुसऱ्या वर्षीदेखील थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठीही ईडब्ल्यूएससाठी आरक्षित राहतील. त्यामुळे ईडब्ल्यूएससाठी द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठींच्या जागांमध्ये वाढ होईल.

प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) नाही

१० वी व १२ वीच्या विद्यार्थांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. या मूल्यांकन व निकालाच्या आधारे मंडळामार्फत गुणपत्रक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे या गुणपत्रकाच्या आधारेच दहावी व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेताना १० वी व १२ वीच्या गुणांचा विचार करण्यात येणार आहे. तसेच अभियांत्रिकी पदविकेचे शिक्षण मराठी भाषेमध्ये शिकण्याचा पर्याय यावर्षी राज्यात पहिल्यांदाच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

प्रवेश व शुल्क समिती गठीत

महाराष्ट्र विना अनुदानीत खाजगी व्यवसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क विनियमन) अधिनियम -२०१५ नुसार समिती गठीत करण्यात आली असून यामध्ये उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश विजय लखीचंद आचलिया अध्यक्ष आहेत. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. विजय खोले, सनदी लेखापाल मनोज चांडक, परिव्यय लेखापाल रत्नाकर फडतरे, व्यवसायिक शिक्षण तज्ज्ञ धर्मेंद्र मिश्रा, यांची या समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती पुढील पाच वर्षांसाठी नियुक्त करण्यात आली आहे.

(हेही वाचा : मुंबईकरांना ‘फुकट’ नको, ‘विकत’ हवी… खासगी केंद्रांवरील लसीकरण जोरात)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.