महाराष्ट्र शासन महिला फुटबॉल स्पर्धेचे आयोजक, तिजोरी मात्र महापालिकेची रिकामी होणार!

मुंबईमध्ये १७ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२२ या कालावधीमध्ये एशियन फुटबॉल कॉनफेडेरेशन आयोजित आशियाई महिला करंडक स्पर्धेचे आयोजन भारत देशात होणार आहे.

84

कोविडच्या उपाययोजना राबवण्यासाठी महापालिकेच्यावतीने सुमारे चार हजारांहून अधिक कोटी रुपये खर्च झाले असून यामुळे अनावश्यक खर्चाला कात्री लावण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे अंधेरीतील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलातील महाराष्ट्र शासन आयोजित आशिया कप महिला फुटबॉल स्पर्धेकरता तब्बल ६० लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. हे संकुल महापालिकेने ललित कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या ताब्यात दिले असून कोविडमुळे प्रतिष्ठान आर्थिक संकटात आहे. त्यामुळे राज्य शासनाने आयोजित केलेल्या या स्पर्धेकरता महापालिकेच्या तिजोरीत हात घालण्यात आला आहे. एका बाजुला येथील कर्मचाऱ्यांना सरसकट दहा हजार रुपये पगार दिला जात असून त्याबाबत महापालिका कोणताही निर्णय घेत नाही, पण दुसरीकडे केवळ राज्यशासन सांगतेय म्हणून त्यावर आपल्याच तिजोरीत हात घालून ६० लाख रुपये प्रतिष्ठानला द्यायला निघाले असून या प्रस्तावाला स्थायी समितीसह महापालिकेने मंजुरी दिली आहे.

आशियाई महिला करंडक स्पर्धेचे आयोजन

मुंबईमध्ये १७ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२२ या कालावधीमध्ये एशियन फुटबॉल कॉनफेडेरेशन आयोजित आशियाई महिला करंडक स्पर्धेचे आयोजन भारत देशात होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेचे काही सामने अंधेरी स्पोर्टस काँम्प्लेक्स, नवी मुंबईतील डॉ. डी.वाय. पाटील स्टेडियम, पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात पार पडणार आहेत. या स्पर्धेच्या आयोजनासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक परदेशी फुटबॉलप्रेमी नागरीक भारताला भेट देणार असल्याने भारतातील पर्यटन व आर्थिक विषयक बाबींना चालना मिळणार असल्याने बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या अंधेरीतील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलात या एशियन कप महिला फुटबॉल स्पर्धा २०२२ आयोजित करण्यात येणार आहे. महापालिकेने हे क्रीडा संकुल प्रतिष्ठानला हस्तांतरीत केले असल्याने येथील देखभालीचा खर्च त्यांनी करणे अपेक्षित आहे. परंतु कोविडमुळे प्रतिष्ठानच्या ताब्यातील दोन्ही क्रीडा संकुल १६ महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे प्रतिष्ठान आर्थिक संकटात असून येथील फुटबॉल मैदानाच्या परिसरातील देखभाल व दुरुस्तीसाठी आवश्यक असलेला ६० लाख रुपयांचा निधी हा महापालिकेच्या निधीतून प्रतिष्ठानला देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे आयोजन राज्य शासन करत असल्याने त्यासाठी येणारा एकूण खर्च महापालिकेमार्फत प्रतिष्ठानला वर्ग करण्यात येत आहे.

महापालिकेने ६० लाख रुपयांचा भार उचलला

यामध्ये प्लंबिग, रंगकाम, सॅनिटरी फिटींग व इतर किरकोळ कामांसाठी १६ लाख रुपये, विजेच्या वापरात वाढ होणार असल्याने यावरील खर्चासाठी १५ लाख रुपये आणि मुंबई फुटबॉल अरेना या मैदानातील प्रकाश योजनेकरता जे चार हायमास्ट आहेत, त्याच्या देखभालीसह तसेच नवीन दिव्यांच्या खरेदीसाठी ३० लाख अशाप्रकारे ६० लाख रुपये खर्च अपेक्षित असून याला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्यानंतर शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही मान्यता देण्यात आली आहे. शिवसेना युवा नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा हट्ट पुरवण्यासाठी महापालिकेने ६० लाख रुपयांचा भार उचलला असून प्रत्यक्षात महापालिकेने शासनाकडून ही रक्कम वसूल करायला हवी,अशी मागणी होत आहे. भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी येथील प्रतिष्ठानच्या कर्मचाऱ्यांना मुदत ठेवी मोडून पगार दिला जात असून आजही त्यांना सरसकट दहा हजार रुपये पगार दिला जात आहे. त्यामुळे जोवर याबाबत निर्णय होत नाही, तोवर याबाबत निर्णय घेतला जावू नये अशी भूमिका त्यांनी घेतली. स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्षांनी यासर्व मुद्दयांबाबत पुढील बैठकीपूर्वी स्पष्टीकरण केले जाईल, असे सांगत हा प्रस्ताव तातडीने मंजूर करणे आवश्यक असल्याचे कारण देत हा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानंतर शुक्रवारी तातडीचे कामकाज म्हणून हा प्रस्ताव विचारात घेवून महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा प्रस्ताव संमत केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.