मंगळवार, ३१ ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत न्यायमूर्ती शिंदे समितीचा प्रथम अहवाल स्वीकारण्यात आला. (Maratha Reservation) त्यानुसार कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यास मंत्रिमंडळात मंजुरी दिली आहे. मनोज जरांगे यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणार नाही. रात्रीपर्यंत निर्णय घ्या अन्यथा मी जलत्याग करेन, असे जरांगे पाटील यांचे म्हणणे आहे. माध्यमाशी संवाद साधतांना जरांगे पाटलांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.
सरकारने विशेष अधिवेशन बोलावून या संदर्भात निर्णय घ्यावा. अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणार नाही. संबंधित अधिकाऱ्याने ते वाटूसुद्धा नये, तुम्हाला ते वाटू दिले जाणार नाहीत. उद्याच्या उद्या सरकारने विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावेत, अशी मागणी मनोज जरांगे यांनी या वेळी केली. मराठा आरक्षणासाठी चालू असलेल्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. (Maratha Reservation)
(हेही वाचा – Israel-Hamas conflict: पॅलेस्टिनी समर्थकाने नोंदवला विचित्र पद्धतीने निषेध, सोशल मिडियावर धक्कादायक व्हिडियो व्हायरल)
… तर मराठे काय आहेत, ते तुम्हाला कळेल
महाराष्ट्र शांत आहे. सरकारचे लोक गोंधळ घालत आहेत. तरुणांवर गुन्हे दाखल झाले, तर मी स्वत: बीडमध्ये जाऊन जिल्हाधिकाऱ्यांसमोर बसेन. त्यावेळी 5 लाख येतील अथवा 10 लाख आंदोलक येतील, मला त्याची काळजी नाही. लोकशाहीच्या माध्यमातून आम्हाला आंदोलन करू द्या, नाहीतर उद्या मी स्वत: तुमच्याकडे पाहिल्याशिवाय राहणार नाही. मराठे काय असतील, हे तुम्हाला मग कळेल. मराठा आंदोलकांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा मनोज जरांगे यांनी या वेळी दिला.
आधी आंदोलन, मग संचारबंदी
शांततेत आंदोलन सुरु आहे. त्यामुळे आम्हाला त्रास देऊ नका. बीडमध्ये जे सुरु आहे, ते मागे घ्या. अगोदर आमचे आंदोलन आहे, त्यानंतर तुमची संचारबंदी आहे. तुम्ही आम्हाला त्रास दिला, तर पुढे काय होईल, याची जबाबदारी तुमची आहे. अर्धवट प्रमाणपत्र चालणार नाहीत. सरसकट मराठ्यांना आरक्षण हवे आहे, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली आहे. (Maratha Reservation)
महाराष्ट्रात आम्ही एकटे ५० टक्के आहोत. प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आहेत. धनगर, मुसलमान, ओबीसी समाज आमच्यासोबत आहे. दुसऱ्यांसाठी आमची लेकरं उपाशी मारू नका. आरक्षण द्या अन्यथा उद्यापासून पाणीदेखील घेणार नाही. होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे. (Maratha Reservation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community