महाराष्ट्रातही ‘वनतारा’ प्राणीसंग्रहालय उभारण्यासाठी सरकारचा पुढाकार; वनमंत्री Ganesh Naik यांची माहिती

60
महाराष्ट्रातही ‘वनतारा’ प्राणीसंग्रहालय उभारण्यासाठी सरकारचा पुढाकार; वनमंत्री Ganesh Naik यांची माहिती
  • प्रतिनिधी

गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या ‘वनतारा’ प्राणीसंग्रहालयाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही असेच प्रकल्प सुरू करण्याचा सरकारचा विचार असून, यासाठी उद्योगपतींनी पुढाकार घ्यावा, असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात आल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी विधानसभेत दिली. तसेच, उद्योगपती अनंत अंबानी यांना महाराष्ट्रातही असे प्राणीसंग्रहालय उभारावे, यासाठी पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मानव-प्राणी संघर्षाचा मुद्दा विधानसभेत गाजला

राज्यातील वाघ आणि बिबट्यांमुळे वाढत्या मानव-प्राणी संघर्षावर बुधवारी विधानसभेत अनेक सदस्यांनी चिंता व्यक्त केली. भंडारा जिल्ह्यातील कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर झोनमध्ये वाघाच्या हल्ल्यात एका महिलेला जीव गमवावा लागला, असा मुद्दा विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला. भंडारा वनविभागातील अडयाळ लाखांदूर येथे बीटी-१० या वाघिणीच्या २ वर्षीय बछड्याने हल्ला केला असल्याची माहिती वनमंत्र्यांनी (Ganesh Naik) दिली. संबंधित बछड्याला पकडून कोका नियत क्षेत्रात सोडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – मंत्री Manikrao Kokate यांच्या शिक्षेला स्थगिती; नाशिक सत्र न्यायालयाचा निर्णय)

शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक

मानव-प्राणी संघर्षाचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी येत्या शुक्रवारी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात बैठक होणार असल्याची घोषणा करण्यात आली.

राज्यात ६ राष्ट्रीय उद्याने, ५२ वन्यजीव अभयारण्ये

गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्र ६१,९९१.८९ चौ. कि. मी. आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी राज्यात ११ प्रादेशिक वनवृत्त आणि २ वन्यजीव वनवृत्त कार्यरत आहेत. तसेच, वन्यजीव संरक्षणासाठी ६ राष्ट्रीय उद्याने, ५२ वन्यजीव अभयारण्ये आणि २८ संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित करण्यात आली आहेत. यातील ५ राष्ट्रीय उद्याने आणि १५ अभयारण्ये एकत्र करून ६ व्याघ्र प्रकल्प निर्माण करण्यात आले आहेत.

(हेही वाचा – भोकरदनमधील कैलास बोराडेंना मारहाण प्रकरणी ‘मकोका’ लावणार; DCM Eknath Shinde यांची घोषणा)

महाराष्ट्रातील वाघांची संख्या ४४४ वर

सन २००० मध्ये राज्यात फक्त १०१ वाघ होते, मात्र आता ही संख्या ४४४ वर पोहोचली असल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले. हिंस्त्र प्राण्यांचे भक्ष्य असलेल्या शाकाहारी प्राण्यांची संख्या वाढावी म्हणून वनक्षेत्रात रायवळ आंबा, फणस यांसारखी फळझाडे लावण्याच्या सूचना वनविभागाला देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातही ‘वनतारा’ निर्माण होणार?

गुजरातमध्ये अनंत अंबानी यांच्या पुढाकाराने ‘वनतारा’ हे अत्याधुनिक प्राणीसंग्रहालय उभारण्यात आले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही असेच प्रकल्प सुरू करण्याचा विचार आहे. त्यासाठी उद्योगपतींनी सहकार्य करावे, असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहे, असेही गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी सांगितले.

या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील वन्यजीव संवर्धनाला मोठी चालना मिळण्याची शक्यता असून, सरकारच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.