राज्यातील 7 लाख 15 हजार रिक्षा परवानाधारकांना मिळणार अनुदान

95

राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून घातलेले निर्बंध व त्या अनुषंगाने राज्य शासनाने राज्यातील रिक्षा परवानाधारकांना अनुदान जाहीर केले. त्यासंदर्भात आढावा घेण्यासाठी मंगळवारी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी व परिवहन विभागातील अधिकारी यांच्या समवेत मंत्रालयात बैठक झाली. राज्यात 7 लाख 15 हजार रिक्षा परवानाधारक असून, त्यांना प्रत्येकी 1500 रुपयांप्रमाणे एकूण 107 कोटी रुपये अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यांवर थेट ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली.

रक्कम थेट खात्यात

याकरता परिवहन विभागामार्फत ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात येत असून, त्यामध्ये परवानाधारक रिक्षा चालकांना आपले आधार क्रमांक, वाहन क्रमांक व अनुज्ञप्ती(रजिस्टर) क्रमांक याची ऑनलाइन नोंद करावी लागेल. खातरजमा झाल्यानंतर आधार क्रमांकाशी जोडणी असलेल्या बँक खात्यामध्ये ही रक्कम ऑनलाइन पध्दतीने जमा करण्यात येणार आहे.

(हेही वाचाः राज्यात 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन… मुख्यमंत्री करणार घोषणा!)

आधार क्रमांकाशी बॅंक खाते जोडणे बंधनकारक

या प्रणालीची माहिती विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याकरता रिक्षा परवानाधारकांचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी जोडणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व रिक्षा परवाना धारकांनी आपले बँक खात्याची आधार क्रमांकाशी तात्काळ जोडणी करुन घ्यावी, जेणेकरुन या अनुदानाची रक्कम वेळेवर अदा करता येईल, असे आवाहन परिवहन मंत्री परब यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.