लासलगाव येथे वादळी वाऱ्याच्या तडाख्यात दीड एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून तोडणीला आलेली द्राक्ष बाग पुर्णतः जमिनीवर झोपल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रल्हाद पाटील मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कोटमगाव रोड कांदा बाजार समिती जवळ येथील शेतकरी प्रल्हाद कमलाकर पाटील यांचा दीड एकर द्राक्ष बाग वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सापडल्याने संपूर्ण द्राक्ष बाग भुईसपाट झाला आहे. त्यामुळे हातातोंडाला आलेला घास गेल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची वर्षभराची मेहनत वाया गेली आहे. द्राक्षांचे घड जमीवर पडले आहे. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, यातून सावरायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
प्रल्हाद पाटील यांच्या एस.एस.एन व्हरायटीचा द्राक्ष बाग हार्वेस्टिंगच्या टप्प्याचा असतानाच वादळाच्या तडाख्यात सापडल्याने जवळपास आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी व्यापारी सदर द्राक्ष बाग बघून गेले होते. या द्राक्षांना ५० ते ५५ रुपये दर मिळाला असता तसेच हे द्राक्ष रशिया येथे एक्सपोर्ट होणार होते. मात्र आता पूर्ण द्राक्ष बाग जमीनदोस्त झाल्याने द्राक्षांचे संपूर्ण नुकसान झाले असल्याने व्यापारी आता पडत्या दराची बोली लावत आहे. मोठ्या कष्टाने पोटच्या पोराप्रमाणे द्राक्ष बाग वाढवली आणि हार्वेस्टिंगच्या टप्प्याचा असतानाच आस्मानी संकटांने घाला घातला यात संपूर्णता द्राक्ष बाग उध्वस्त झाल्याने प्रल्हाद पाटील यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
(हेही वाचा – उन्हाळ्यात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! लवकरच वाहतूक कोंडी संपणार)
Join Our WhatsApp Community