नेहमीच्या फटक्यांना पर्याय म्हणून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेले हरित फटाकेही घातक असल्याची धक्कादायक माहिती आवाज फाउंडेशनकडून देण्यात आली आहे. सध्या बाजारात मिळणाऱ्या काही फटाक्यांमध्ये बेरियम हा घातक धातू आढळल्याचे या संस्थेने सांगण्यात आले आहे. फटाक्यांमुळे होणारे ध्वनि प्रदूषण रोखण्याकरिता ही संस्था २०१८ सालापासून काम करते.
फटाक्यांतील ‘बेरियम’ या घटकावर सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी घालण्यात आली होती. तरीही हा घटक फटाक्यांमध्ये आढळल्याने आवाज फाउंडेशनने या फटाक्यांच्या विक्रीवर निर्बंध आणले जावेत, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना पत्र पाठवून केली आहे.
आवाज फाउंडेशनकडून ३ नोव्हेंबर रोजी बाजारात विकल्या जाणाऱ्या ग्रीन लेबल फटाक्यांची (green-fireworks) चाचणी करण्यात आली होती. यामध्ये बहुतांश हरित फटाक्यांमध्ये बेरियम या घातक घटकासह इतरही घातक घटक असल्याची माहिती आवाज फाउंडेशनच्या सुमैरा अब्दुलाली यांनी मंगळवारी दिली आहे.
अनेक खोक्यांवर क्यू आर कोड नाही
हरित फटाक्यांवर क्यूआर कोड असावा, अशी सूचना अब्दुलाली यांनी केली आहे. क्यू आर कोडमुळे कमी प्रदूषण करणारे, त्यामध्ये घातक रसायन नसलेले फटाके असल्याची खात्री ग्राहकांना मिळते. सन २०१८ मध्ये ‘आवाज फाउंडेशनने’ यासंदर्भात माहिती घेतली तेव्हा फटाक्यांच्या अनेक खोक्यांवर क्यूआर कोड नसल्याचे आढळले तसेच काही फटाक्यांवर क्यू आर कोड होता तो खोटा असल्याचेही समोर आले आहे.
मुख्यमंत्र्यांना पत्र
सर्वोच्च न्यायालयाने २९ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निर्देशांतसुद्धा याबद्दल नमूद केले होते. घातक रसायने आणि घटक वातावरणात उत्सर्जित न होणे हे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सध्या वायू प्रदूषणाचे परिणाम गंभीर स्वरुप धारण करत असल्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी असे खोटे हरित फटाके बाजारात उपलब्ध होऊ नये यासाठी राज्य सरकारने त्यावर बंदी आणावी आणि त्याची विक्री ताबडतोब थांबवणे गरजेचे आहे , अशी मागणी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात करण्यात आली आहे.
हरित फटाके म्हणजे काय?
मुंबईत गल्लोगल्ली फटाक्यांची विक्री सुरू झाली आहे. या फटाक्यांच्या दुकानांमध्ये उपलब्ध असलेल्या फटाक्यांच्या खोक्यांवर हरित फटाक्यांचा शिक्का आहे, मात्र, या हरित फटाक्यांविषयी विक्रेत्यांना फारशी माहिती नाही, असे दिसत आहे. तसेच ग्राहकांकडूनही हरित फटाक्यांविषयी फारशी विचारणा होताना दिसत नाही, अशी माहिती आवाज फाउंडेशनकडून समोर आली आहे.
Join Our WhatsApp Community