मुंबईत फेरीवाल्यांच्या (Hawkers in Mumbai) वाढत्या समस्येमुळे नागरीक हैराण झाले असून दादरसह सर्वच रेल्वे स्थानकांना फेरीवाल्यांनी विळखा घालत मिळेल तिथे पथारी पसरवत जागा अडवल्याने नागरीकांना रेल्वे स्थानकात जाणे आणि येणेही कठिण होऊन बसले आहे. या फेरीवाल्यांच्या वाढत्या समस्येमुळे प्रवाशांच्या गाड्याही चुकत चालल्या आहेत. मात्र, जनतेला होत असलेल्या या त्रासाबद्दल महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासन हे हातावर हात घालून बसले आहेत, तर महापालिके संदर्भातील जनतेच्या समस्या जाणून घेणारे पालकमंत्र्यांचाही या वाढत्या फेरीवाल्यांच्या समस्याकडे पाहायला वेळ नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकाजवळील रस्ते आणि पदपथ हे फेरीवाल्यांनाच आंदण देऊन टाकले कि काय असा सवाल आता जनतेकडून केला जात आहे.
प्रभादेवी (एलफिस्टन)रेल्वेपुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे परिसरातील सर्व फेरीवाल्यांना (Hawkers in Mumbai) हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयानेही रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर आणि मंडई, शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळ आदींपासून १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव करणारे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबईमध्ये महापालिकेच्यावतीने प्रत्येक रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर परिसरात पांढरा पट्टा मारुन त्या पट्टयाच्या बाहेर फेरीवाल्यांना बसण्यास परवानगी दिली जाते. परंतु महापालिकेने मारलेले दीडशे मीटर अंतराचे पट्टे हे केवळ नावापुरतेच असून या दीडशे मीटर अंतराच्या आतील परिसरातच मोठ्याप्रमाणात फेरीवाले बसत आहेत. परंतु या फेरीवाल्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही.
(हेही वाचा – Free Medical Treatment : १५ ऑगस्टपासून राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत मिळणार मोफत उपचार)
दादर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूस रानडे मार्ग, डिसिल्वा मार्ग, जावळे मार्ग, तसेच सेनापती बापट मार्ग व त्यावरून जाणाऱ्या केशवसूत उड्डाणपुलाखालील ११ गाळे आदी भागांमध्ये मोठ्याप्रमाणात फेरीवाले (Hawkers in Mumbai) बेशिस्तपणे बसत आहेत. या सर्वांवर महापालिकेच्यावतीने कारवाई केली जात असली तरी त्यांची पाठ फिरताच पुन्हा फेरीवाले पथारी पसरवून बसतात. तसेच या फेरीवाल्यांचे सामान जप्त करण्यासाठी मनुष्यबळासह जी वाहने उभी केली जातात, त्या वाहनांच्या दहा पावलांच्या पुढेही व्यावसाय सुरुच राहतात. त्यामुळे या महापालिकेच्या कारवाईची तसेच पोलिसांच्या कारवाईची कोणतीही भीती फेरीवाल्यांमध्ये राहिलेली नाही.
दादर पश्चिम भागात मागील काही महिन्यांपासून पोलिसांच्यावतीने कारवाई करून १२०० रुपयांचा दंड वसूल केला जात होता. परंतु ही कारवाई दीडशे मीटरच्या आतील भागात न करता दीडशे मीटरच्या पुढील भागांमध्ये केली जात होती. मात्र, याबाबत पोलिसांकडे लेखी माहिती मागितल्यानंतर त्यांनी आपण दीडशेच्या आतील बाजुसच कारवाई करत असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु मागील चार ते पाच दिवसांपासून ती कारवाई सुध्दा बंद झाल्याने दादर पश्चिम भागांमध्ये फेरीवाल्यांनी (Hawkers in Mumbai) रस्ते, पदपथ तसेच मोकळया जागा अडवून ठेवल्याने पादचाऱ्यांना चालताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दादर पश्चिमसह पुर्व बाजुस दादासाहेब फाळके मार्गावरील दीडशे मीटरच्या आतमध्ये मोठ्याप्रमाणात फेरीवाले (Hawkers in Mumbai) बसलेले पहायला मिळतात. याशिवाय बोरीवली पश्चिम, कांदिवली, गोरेगाव, मालाड, दहिसर, सांताक्रुझ पश्चिम, वांद्रे, खार पश्चिम, कुर्ला, चेंबूर, टिळक नगर, मानखुर्द, घाटकोपर पश्चिम, विक्रोळी पश्चिम, भांडुप, मुलुंड आदी रेल्वे स्थानकांच्या दीडशे मीटर परिसरात फेरीवाल्यांनी पदपथ आणि रस्ते अशाप्रकारे अडवून ठेवले की प्रवाशांना धड आपली नियमित गाडी पकडताही येत नाही. मात्र, सर्व भागातील महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांचा याकडे दुर्लक्ष असून किमान न्यायालयाच्या निर्देशानुसार दीडशे मीटर परिसरातील फेरीवाल्यांवर तरी दोन्ही प्रशासनाने कारवाई करावी अशी आर्जवी प्रशासनाकडून केली जात आहे. रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरचा परिसर पोलिस आणि महापालिकेने फेरीवाला मुक्त केल्यास मुंबईकरांना मोठा दिलासा मिळू शकतो. सध्या महापालिकेत प्रशासक असून लोकप्रतिनिधी नसल्याने पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या जात असल्या तरी या समस्येकडे शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा दुर्लक्षच होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालकमंत्री जनतेच्या या समस्यांकडे लक्ष देणार का असा सवाल आता जनतेकडून केला जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community