जागतिक भूक निर्देशांक २०२१ च्या ११६ देशांच्या यादीत भारताची १०१ व्या स्थानावर घसरण झाली आहे. २०२० मध्ये भारताचे स्थान ९४ होते. कोरोना महामारीच्या गंभीर संकटामुळे जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण झाली आहे. हा निर्देशांक आयर्लंडमधील कन्सर्न वर्ल्डवाइड व जर्मनीतील वेल्ट हंगर हिल्फ या संस्थांनी तयार केला आहे. देशातील बहुसंख्य जनतेला दोन वेळेचे जेवण मिळत नाही, लाखो लोक भुकेलेले, कुपोषित आहेत, शिवाय पाच वर्षांखालील मुलांचे वजन व उंची आंतरराष्ट्रीय मानकानुसार कमी असून बाल मृत्यूदराचे प्रमाणही भारतात अधिक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मूल्यांकनात भारताच्या शेजारी देशांचा विचार केला तर, पाकिस्तान (९२), बांग्लादेश (७६), नेपाळ (७६), म्यानमार (७१) हे शेजारी देश भारताच्या पुढे आहे.
दूरध्वनीद्वारे प्रश्न विचारुण मूल्यांकन
भूक निर्देशांकांमधील घसरण धक्कादायक असून कुपोषित लोकसंख्येच्या प्रमाणावर आधारित करण्यात आलेले हे मूल्यांकन ‘अशास्त्रीय’ असल्याचे दिसून येते, असे महिला व बालकल्याण मंत्रालयाने स्पष्ट केले. ‘गॅलप’ने दूरध्वनीद्वारे केलेल्या चार प्रश्नांच्या जनमत चाचणीच्या निकालांवर हे मूल्यांकन करण्यात आले आहे, तसेच अहवाल प्रसिध्द करण्यापूर्वी संस्थेने योग्य परिश्रम घेतले नसल्याचा आरोप महिला व बालकल्याण मंत्रालयाने केला आहे.
(हेही वाचा : माझ्या आग्रहाने उद्धव ठाकरे बनले मुख्यमंत्री! फडणवीसांच्या आरोपाचा पवारांनी केला खुलासा)
जागतिक भूक निर्देशांक म्हणजे काय?
जागतिक भूक निर्देशांक GHI जगभरातील भूक आणि कुपोषणाची स्थिती देशांच्या क्रमांकानुसार अधोरेखित करणे. हा निर्देशांक काढताना चार घटक विचारात घेतले जातात, लोकसंख्येतील कुपोषणाचे प्रमाण, बालक वाढ, मुलांच्या अवयवांची झीज आणि बालमृत्यू. भारताचा भूक निर्देशांक २०१२ ते २०२१ या काळात २७.५ ते २८.८ च्या दरम्यान आहे.
निर्देशांकाचे निकष
- ० ते ९.९ – कमी उपासमार
- १० ते १९.९ – मध्यम उपासमार
- २० ते ३४.९ – गंभीर उपासमार
- ३५ ते ४९.९ – धोक्याची घंटा
- ५० किंवा जास्त – भयावह स्थिती