देशातील महागाई वाढतच चालली आहे. आता वस्तूंवरील दरवाढीची झळ आणखी तीव्र होणार आहे. जीएसटी (GST) परिषदेने काही वस्तूंवर जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही नवीन दरवाढ 18 जूलैपासून लागू होणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर, त्यांनी सांगितले की, कॅसिनो, ऑनलाइन गेमिंग आणि घोड शर्यतीवरील कराचा प्रस्ताव पुनर्विचार करण्यासाठी मंत्रिगटाकडे पाठवण्यात आला आहे. गोव्याच्या अर्थमंत्र्यांनी कॅसिनोवरील जीएसटी दराबाबत चर्चा करण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे या तीन गोष्टींवरील जीएसटीवर पुनर्विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हे खाद्यपदार्थ महागणार
पाकिट बंद आणि लेबल असलेल्या खाद्यपदार्थांवर जीएसटी लागू करण्यात आला आहे. यामध्ये मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सोयाबीन, मटार आदी पदार्थांसह मुरमुरेंवर आता पाच टक्के जीएसटी लागू होणार आहे. आतापर्यंत हे पदार्थ जीएसीटीबाहेर होते. त्याशिवाय टेट्रा पॅक आणि बॅंकेकडून जारी करण्यात येणा-या धनादेश सेवांवर 18 टक्के आणि एटससह नकाशा आणि चार्टसह 12 टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे.
( हेही वाचा: ‘छत्री’ ही पावसापासून संरक्षणासाठी बनलीच नव्हती; वाचा छत्रीच्या उगमाचा रंजक इतिहास )
हाॅटेल आणि रुग्णालयातील खोल्यांच्या दरातही वाढ
बजेट हाॅटेल आणि रुग्णालयातील खोल्यांच्या दरावरही जीएसटी लागू करण्यात आला आहे. आतापर्यंत हाॅटेलच्या प्रतिदिवस 1000 रुपये भाडे दर असणा-या रुमसाठी जीएसटी लागू करण्यात आले नव्हते. आता या खोल्यांसाठी 12 टक्के कर लागू करण्यात आला आहे.