लोढा यांच्या जनता दरबारानंतर आता केसरकर हेही साधणार जनतेशी सुसंवाद

हिंदुस्थान पोस्टच्या वृत्तानंतर शिवसेना झाली जागी

221
लोढा यांच्या जनता दरबारानंतर आता केसरकर हेही साधणार जनतेशी सुसंवाद
लोढा यांच्या जनता दरबारानंतर आता केसरकर हेही साधणार जनतेशी सुसंवाद

मुंबईसह इतर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे ‘सरकार आपल्या दारी’ या मोहिमेअंतर्गत मुंबईतील महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्येक महापालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये जनता दरबार आयोजित करत आहेत. परंतु त्यातुलनेत पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून शिवसेनेकडून कोणताही प्रयत्न होत नाही. याबाबत हिंदुस्थान पोस्टने ‘मुंबईत भाजप जोमात, शिवसेना कोमात’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अखेर शिवसेनेनेही मुंबईत जनता दरबार घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर ‘सरकार आपल्या दारी’, ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून येत्या बुधवार आणि गुरुवारी नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षासोबत युती करत भाजपने सरकार स्थापन केले असले तरी प्रत्यक्षात सत्तेचा लाभ भाजपच उठवत असल्याचे दिसून येत आहे. सत्तेचा पुरेपूर वापर करत गल्लीबोळापर्यंत पक्षाची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यामुळे भाजप जोमात असून शिवसेना मात्र कोमात असल्याने सध्या पाहायला मिळत आहे. राज्यातील भाजपचे आमदार असलेलेले मंगलप्रभात लोढा हे महिला व बालविकास मंत्री असून उपनगराचे पालकमंत्री आहेत. तर शिवसेनेचे आमदार असलेले दिपक केसरकर हे शालेय शिक्षण मंत्री तसेच शहराचे पालकमंत्री आहेत. परंतु पालकमंत्री पदाचा योग्य वापर भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांच्याकडून सुरू असून आजवर उपनगरांमधील प्रत्येक प्रभागांमधील महापालिकेच्या विकासकामांचा आढावा बैठकांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी आणि जनतेसोबत घेणाऱ्या लोढा यांनी शहरातील महापालिकेच्या कार्यालयांमध्येही महिला व बाल कल्याण खात्याच्या माध्यमातून महिलांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

(हेही वाचा – मुंबईत भाजप जोमात, शिवसेना कोमात)

शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर हे असतानाच लोढा यांनी शहरांमधील महापालिकेच्या कार्यालयांमध्ये महिला व बाल कल्याण खात्याच्या माध्यमातून सरकार आपल्या दारी असा उपक्रम राबवत आहे. विशेष म्हणजे शहरांमध्ये अशाप्रकारचा कार्यक्रम राबवताना पालकमंत्री म्हणून केसरकर यांनी उपस्थित राहणे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मंत्री महोदयांनी कार्यक्रम करणे आवश्यक आहे. परंतु युतीमध्ये सत्ता असली तरी भाजप शिवसेनेला जुमानत नसून आगामी महापालिका निवडणुकीत १५० नगरसेवक निवडून आणण्यासाठी भाजपने पूर्णपणे सत्तेचा वापर करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

भाजप मुंबईमध्ये जोरदार मोर्चेबांधणी करत असताना शिवसेनेच्यावतीने शहराचे पालकमंत्री म्हणून ना केसरकर काही कार्यक्रम राबवत ना पक्षाच्या नेत्यांच्या माध्यमातून काही प्रयत्न केले जात. केसरकर हे सावंतवाडीचे आमदार असून त्यांना मुंबईशी काही पडलेले नाही आणि शिवसेनेचे लक्ष ठाण्याकडे असल्याने त्यांना मुंबईचे काही पडलेले नाही. त्यामुळे मुंबई भाजपला देऊन ठाणे शिवसेनेकडे राखण्याच्या दृष्टीकोनातून युतीचे प्रयत्न केले जात असल्याचे बोलले जात आहे.

या वृत्तांनंतर मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर हे ‘जनतेशी सुसंवाद’ साधणार आहेत. ‘सरकार आपल्या दारी’, ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून येत्या बुधवार आणि गुरुवारी नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

केव्हा आणि कुठे होईल संवाद?

बुधवार १० मे रोजी महानगरपालिकेच्या ‘सी वॉर्ड’ मध्ये कॉन्फरन्स हॉल, सी विभाग कार्यालय, चंदनवाडी, मरीन लाईन्स येथे तर गुरूवार ११ मे रोजी ‘डी वॉर्ड’ मध्ये कॉन्फरन्स हॉल, डी विभाग कार्यालय, ग्रँट रोड (प.) येथे सायंकाळी ४ ते ६ या वेळेत पालकमंत्री केसरकर नागरिकांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमास पालकमंत्री यांच्यासोबत संबंधित विभागांचे लोकप्रतिनिधी, सर्व विभागांचे शासकीय तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात नागरिकांनी शासकीय योजना, आपल्या प्रभागातील विकासकामांबाबत सूचना व इतर समस्यांबाबतच्या निवेदन अथवा अर्जासह उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

लोढा यांनी १९ एप्रिल ते ०९ मे २०२३ पर्यंत शहर भागातील ९ महापालिका प्रशासकीय कार्यलयात जनता दरबार आयोजित केले. ८ मे रोजी एफ उत्तर विभाग आणि ९ मे रोजी ए वॉर्डमध्ये जनता दरबार कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भाजपचे कार्यक्रम संपल्यानंतर आता शिवसेना आमदार असलेले दीपक केसरकर यांनी शहर भागातील ज्या ठिकाणी यापूर्वी लोढा यांनी जनता दरबार घेतले त्यापैकी ‘सी’ व ‘डी’ विभागात जनता दरबार आयोजित करत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.