Mangalprabhat Lodha : पालकमंत्री ऍक्शन मोडवर; रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी विशेष पथके तयार करण्याचे निर्देश

185

मुंबईत मागील काही दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. खड्डयांची ही वाढती समस्या लक्षात घेता उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेऊन हे खड्डे तातडीने हवे असल्यास यासाठी पथक नेमा, पण रस्त्यांवरील खड्डे भरले गेले पाहिजे अशाप्रकारचे निर्देश दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने त्वरीत सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावून प्रत्येक विभागाच्या स्तरावर सहायक आयुक्त हे खड्डे बुजवण्यासाठीच्या कामाचे समन्वय अधिकारी (नोडल) म्हणून कामकाज सांभाळतील, असे जाहीर करून सहायक आयुक्तांवरच याची जबाबदारी सोपवली आहे. विभागस्तरीय रस्ते अभियंता आणि कार्यकारी अभियंता हे आपल्या कामाचा पूर्तता अहवाल सादर करतील. दिवसा खड्ड्यांची पाहणी करून रात्रीच्या वेळेत खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात येईल. विशेष पथके तयार करून खड्डे बुजण्याची कामे युद्ध पातळीवर करण्यात यावी, असे महापालिका प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुंबईत मागील महिनाभरात सातत्याने जोरदार पाऊस कोसळला आहे. पाऊस आणि त्यासोबतीला सततची वाहतूक याचा एकत्रित परिणाम म्हणून रस्त्यांवर खड्डे झालेले आढळले आहेत. खड्डयांमुळे वाहतूक प्रभावित होऊ नये, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत खड्डेविरहित रस्त्यांसाठी पुढाकार घेत मुंबई महानगरपालिका प्रशासनाला निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे, राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सोमवारी महानगरपालिका मुख्यालयात भेट दिली. संपूर्ण मुंबईतील रस्त्यांवर पावसाने निर्माण झालेले खड्डे तातडीने भरुन वाहतूक सुरळीत राहील, नागरिकांना दिलासा मिळेल, अशारितीने प्रशासनाने पावले उचलावी व कामांचे नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री लोढा यांनी दिले.

(हेही वाचा Himachal Pradesh : मुसळधार पावसामुळे १८७ जणांचा मृत्यू तर ८ हजार कोटींचे नुकसान)

त्यानुसार महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाने, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी सर्व संबंधित यंत्रणेची महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी ३१ जुलै २०२३ तातडीने बैठक घेऊन कार्यवाहीला वेग देण्याच्या दृष्टीने सर्व संबंधिताना सूचना केल्या आहेत. यामध्ये रस्ते अभियंत्यांसोबत सर्व पथकं पावसाळ्याच्या काळात प्रत्यक्ष क्षेत्रावर (ऑनफिल्ड) कार्यरत राहतील, याची जबाबदारी सहायक आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे. या दुय्यम अभियंत्यांच्या देखरेखीखाली मास्टिक रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीचा वापर करून खड्डे बुजवण्यात येणार आहेत.

सततच्या पावसामुळे तयार होणारे खड्डे लवकरात लवकर भरावेत, खड्डे भरण्यासाठी विभाग कार्यालय स्तरावर मंजूर केलेल्या निधीचा पुरेपूर वापर करावा. खड्डे भरण्यासाठी रॅपिड हार्डनिंग काँक्रिट, कोल्ड मिक्स, मास्टिक यापैकी योग्य त्या पद्धतीचा अवलंब करावा. सध्या पावसाने उघडीप दिली असल्याने या कालावधीत अधिकाऱ्यांनी आणि अभियंत्यांनी आपआपल्या विभागात रस्त्यांची दिवसा पाहणी करावी. तसेच लगोलग रात्रीच्या वेळेत खड्डे बुजवण्यासाठी मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश  वेलरासू यांनी बैठकीत दिल्या.

या बैठकीवेळी, सर्व यंत्रणांसोबत समन्वय साधणे महत्त्वाचे असल्याने त्याकडेही सर्व संबंधितांनी लक्ष पुरवावे, असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू म्हणाले. कॉंक्रिट रस्ते आणि डांबराचे रस्ते तसेच दोन रस्त्यांमधील पॅच हे रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिटने भरून पुनर्पृष्टीकरण करण्यात यावे, तसेच प्रकल्प रस्त्यांसाठीही रॅपिड हार्डनिंग काँक्रिटचा वापर करावा, असे वेलरासू यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.