दा. कृ. सोमण
Gudi Padwa 2025 : रविवार, ३० मार्च रोजी गुढीपाडवा (Gudi Padwa) आहे. शालिवाहन शके १९४७, विश्वावसुनाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. साडेतीन मुहूर्तातील हा दिवस आहे. शुभ कार्याचा प्रारंभ याच दिवशी करूया. आपणही आळस, अस्वच्छता, अज्ञान, नैराश्य यांना घालवून उद्योगशीलता, स्वच्छता, ज्ञानप्राप्ती करून घेऊया. स्वत: आनंदित होऊन इतरांच्या जीवनात आनंद फुलवूया. या दिवशी आपण विजयाची, प्रगतीची गुढी उभारूया. (Gudi Padwa 2025)
ब्रह्मदेवाने हे जग चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले. त्यामुळे गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने आपण या दिवशी जगाचा वाढदिवस साजरा करीत असतो. पैठणच्या शालिवाहन राजाने अत्याचारी शक लोकांचा पराभव करून त्यांच्या जाचापासून जनतेची मुक्तता केली. या विजयाप्रीत्यर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून त्याने शालिवाहन शक सुरू केले. या वर्षी रविवार, ३० मार्चपासून शालिवाहन शक १९४७ विश्वावसुनाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. ज्या राजाने विजय मिळविला, तो शालिवाहन आणि ज्यांच्यावर विजय मिळविला, ते शक ही दोन्हीही नावे यामध्ये येतात. तसेच प्रभू रामचंद्र दुष्ट रावणाचा वध करून, विजयी होऊन चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी अयोध्येत आले. लोकांनी आनंदाने आपापल्या घरासमोर गुढी उभारून प्रभू रामचंद्रांचे स्वागत केले. म्हणून या दिवशी घरासमोर विजयाची, पराक्रमाची प्रगतीची गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली.
(हेही वाचा – Bank of Baroda SO Recruitment : बँक ऑफ बडोदा विशेष अधिकारी पदासाठी नियुक्ती सुरू)
पुढील १० वर्षातील गुढीपाडव्याचे दिवस
(१) गुरुवार, १९ मार्च २०२६, (२) बुधवार, ७ एप्रिल २०२७, (३) सोमवार, २७ मार्च २०२८ , (४) शुक्रवार, १६ मार्च २०२९, (५) बुधवार, ३ एप्रिल २०३०, (६) सोमवार, २४ मार्च २०३१, (७) रविवार, ११ एप्रिल २०३२, (८) गुरुवार, ३१ मार्च २०३३, (९) मंगळवार, २१ मार्च २०३४, (१०) सोमवार, ९ एप्रिल २०३५.
गुढीपाडव्याचा दिवस
गुढीपाडव्याच्या दिवशी अभ्यंगस्नान करावयास सांगितले आहे. सुगंधी तेलाने अगोदर शरीराला मसाज करावा, त्यानंतर गरम पाण्याने स्नान करावे. अभ्यंगस्नानाला ‘मांगलिक स्नान’असेही म्हणतात. अभ्यंगस्नान करण्याची प्रथा फार प्राचीन काळापासून आहे. माणूस ऐहिक सुखोपभोगासाठी तेले व सुगंधी द्रव्ये वापरू लागल्यावर अभ्यंगस्नानाचा विधी रूढ झाला. शरीराचे स्नायू बलवान व्हावे, बल, पुष्टी आणि त्वचेची कांती वाढावी, या उद्देशाने अभ्यंगस्नान करण्याची पद्धत सुरू झाली. शरीराचे आणि मनाचे आरोग्य चांगले रहावे, हा त्यामागचा उद्देश होता. पुढे अभ्यंगस्नानाला धार्मिक स्वरूप प्राप्त झाले. मसाज करण्यासाठी तीळ, खोबरे यांचे तेल किंवा तूप वापरतात. तसेच अभ्यंगस्नानासाठी चंदन, गुलाब, मोगरा इत्यादी फुलांपासून नैसर्गिक पद्धतीने तयार केलेली अत्तरे वापरतात. मात्र केमिकल वापरून तयार केलेली अत्तरे वापरू नयेत. त्यापेक्षा सुगंधी फुले स्नानासाठी वापरण्याच्या पाण्यामध्ये घालावीत. अभ्यंगस्नानानंतर नूतन वस्त्रालंकार धारण करावेत. दरवाजाला आंब्याच्या पानांचे, फुलांचे तोरण बांधावे. दरवाजासमोर सुंदर रांगोळी काढावी. रांगोळी ही सर्वत्र शुभप्रद आणि अशुभनिवारक मानली जाते. जिथे रांगोळी आहे, तिथे देव-देवतांचा निवास असतो, असा समज आहे.
(हेही वाचा – सोशल मीडियावर Ghibli चे वेड; ‘एआय’ चित्रांचा महापूर)
गुढीपूजन
गुढीला ‘ब्रह्मध्वज’ असे म्हणतात. वेळूची (बांबूची) काठी घ्यावी. ती स्वच्छ धुवून तिच्या टोकावर रेशमी वस्त्र, फुलांची माळ, साखरेची माळ बांधून त्यावर एक उलटा कलश ठेवून ती गुढी उभारावी. गुढीची षोडशोपचार पूजा करावी. प्रत्येक उपचार समर्पण करताना ‘ब्रह्मध्वजाय नम:’ असे म्हणावे. पूजा झाल्यावर नमस्कार करून प्रार्थना करावी — ‘ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभिष्टफलप्रभ । प्राप्तेऽस्मन्वत्सरे नित्यं मदगृहे मंगलं कुरु॥’ नंतर नूतन शालिवाहन शक १९४७, विश्वावसुनाम संवत्सराच्या पंचांगाची पूजा करून त्यातील संवत्सर फलादेश वाचावा. तसेच कडुनिंबाची कोवळी पाने घेऊन त्यात जिरे, मिरी, हिंग, सैंधव मीठ आणि ओवा घालून चांगले वाटावे आणि ते थोडे घरातील सर्वांनी खावे. वर्षारंभी कडुनिंब खाल्ल्याने वर्षभर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. नंतर नूतन शालिवाहन शक वर्ष १९४७ विश्वावसुनाम पंचांगाची पूजा करून पंचांगातील वर्षफल वाचन करावे. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक शुभ दिवस आहे. या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी करावी. शुभ कार्याचा प्रारंभ करावा.
नूतन वर्षात काय आहे ?
तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या पाच गोष्टींची माहिती त्यात असते, म्हणून त्याला पंचांग म्हणतात. चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून फाल्गुन अमावास्येपर्यंतची माहिती पंचांगात दिलेली असते. या वर्षीच्या नवीन वर्षाच्या पंचांगात दोन गुढीपाडवे येत आहेत. रविवार, ३० मार्च २०२५ या दिवशी गुढीपाडवा आहे. वर्षांच्या शेवटच्या दिवशी गुरुवार, १९ मार्च २०२६ फाल्गुन अमावास्येच्या दिवशी चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथीचा क्षय होत असल्याने त्याच दिवशी सकाळी ६.५३ नंतर म्हणजेच फाल्गुन अमावास्या संपल्यावर नूतन शालिवाहन शक वर्ष १९४८ ची गुढी उभारावयाची आहे. यापूर्वी असे सन २०१७ (शके १९३९) मध्ये घडले होते. या वर्षानंतर पुन्हा असे सन २०३२ (शके १९५४) मध्ये घडणार आहे. जी तिथी कोणत्याही दिवशी सूर्योदयाच्या वेळी नसते, तिला ‘क्षय तिथी’ म्हणतात. जी तिथी लगतच्या दोन दिवशी सूर्योदयाला असते तिला ‘वृद्धी तिथी’ म्हणतात.
या नूतन शालिवाहन शक वर्षात ७ सप्टेंबर २०२५ रोजी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी होणारे आणि ३ मार्च २०२६ रोजी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होणारे चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. २१ सप्टेंबर २०२५ आणि १७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारी सूर्यग्रहणे भारतातून दिसणार नाहीत. या नूतन शालिवाहन शक वर्षात २४ जुलै, २१ ॲागस्ट आणि १८ सप्टेंबर असे तीन गुरुपुष्ययोग येत आहेत. तसेच ६ जानेवारी २०२६ रोजी एकच अंगारकी संकष्ट चतुर्थी येणार आहे. १३ जून ते ६ जुलै २०२५ गुरू ग्रह सूर्यतेजात लुप्त झाल्यामुळे दिसणार नाही. तसेच १४ डिसेंबर २०२५ ते ३० जानेवारी २०२६ शुक्र ग्रह सूर्यतेजात लुप्त झाल्यामुळे दिसणार नाही. या वर्षी चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, मार्गशीर्ष, माघ आणि फाल्गुन या महिन्यात विवाह मुहूर्त आहेत.
(हेही वाचा – BMC : नितीन शुक्ला यांची दीड महिन्यात बदली; बी विभागात आता कशी करणार कारवाई?)
सन १९९९ मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी डोंबिवली नगरात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी पहिली शोभायात्रा संपन्न झाली. अनेक लोक पारंपारिक पोशाख घालून या शोभायात्रेत उत्स्फूर्तपणे सामील झाले होते. त्यानंतर त्याचे अनुकरण इतर शहरांमध्येही होऊ लागले. एका चांगली प्रथा सुरू झाली. या वर्षी ठाणे नगरातही शोभायात्रेचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सर्वांनी प्रगतीची, उत्तम आरोग्याची, समानतेची, राष्ट्रप्रेमाची आणि सुखसमृद्धीची गुढी उभारूया. त्यासाठी तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा !
(लेखक पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक आहेत.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community