हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी शिवसहाद्री फाउंडेशनच्या वतीने आम्ही वरळीकर या संकल्पनेतून भव्य गुढीपाडवा (Gudhi Padwa 2025) शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे पंधरावे वर्ष असुन जल्लोषात व उत्साहात रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता पारंपरिक वाद्यांचा गजर, मर्दानी खेळ, आकर्षक गुढ्या आणि विविध देखाव्यांसह ही शोभायात्रा (Shobhaayatra) मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
(हेही वाचा – Mahila Bachat Gat : गुढीपाडव्याला मिळणार महापालिकेच्या बचत गटांची घरपोच पुरणपोळी)
यंदाच्या शोभायात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे आपल्या मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा, मिळाला याचा सन्मान म्हणून शोभायात्रेत सहभागी होणार्या प्रत्येक शालेय मुलांना व महिलांना उपयुक्त अशी मराठी पुस्तक भेट स्वरुपात देण्यात येणार आहे. तसेच वरळी विभागातील स्थानिक मराठी लेखक, कवी आणि पत्रकारांचा विशेष सन्मान करण्याचे नियोजन आहे.
शोभायात्रेत वारकरी भजनी मंडळांचा भक्तिमय गजर, साई पालखी सोहळ्याची भव्य मिरवणूक, ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचे भव्य चित्ररथ, तसेच रामायणातील राम-सीता यांचे जीवन दर्शन घडवणारा देखावा हे प्रमुख आकर्षण असणार आहे. यामुळे इतिहास, भक्ती आणि संस्कृती यांचा अनोखा संगम या शोभायात्रेत पाहायला मिळणार आहे.
मराठी (Marathi) भाषेच्या प्रचारासाठी विशेष उपक्रम शोभायात्रे दरम्यान शालेय मुलांनी अधिकाधिक मराठी भाषा व मराठी वर्तमानपत्रे वाचावीत आणि लिहावीत यासाठी मराठी भाषेतील घोषवाक्य,पंचलाईन आणि प्रेरणादायी फलक तयार करण्यात येणार आहेत. हे फलक आणि घोषवाक्ये शोभायात्रेत प्रदर्शित करण्यात येणार असून, “मराठी वाचा, मराठी बोला, मराठी लिहा” हा संदेश प्रभावीपणे देण्यात येणार आहे. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या मराठी भाषेचा जास्तीत जास्त प्रसार आणि वृद्धी साधणे.
यात्रेच्या आकर्षणात भर घालण्यासाठी तरुण-तरुणींनी पारंपरिक मराठमोळ्या वेशात, अभिमानाने फेटे परिधान करून सहभागी व्हावे आणि या सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पारंपरिक वेशभूषेतील नागरिक भगव्या ध्वजांसह सहभागी होणार असून, ढोल-ताशांच्या निनादात संपूर्ण वरळी परिसर दणाणून जाणार आहे. शोभायात्रेची सुरुवात स्थळ – ऐताहासिक जांबोरी मैदान येथून वेळ – सकाळी ८.०० सूरु होणार असून, ती डाॅ.जी.एम.भोसले मार्ग पुढे जाईल.
शिवसहाद्री फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.संजय कदम यांनी सांगितले की, “गुढीपाडवा हा मराठी संस्कृतीचा (Marathi culture) अभिमानाचा दिवस आहे. यंदा मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याच्या निमित्ताने, आम्ही या शोभायात्रेत विविध ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक देखावे सादर करून एक आगळावेगळा सोहळा साकारत आहोत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे.” (Gudhi Padwa 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community