राज्यातील ६ हजार बालरोग तज्ज्ञांना कोविडविषयक टास्क फोर्सने केले मार्गदर्शन

93

कोविड विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर्सना मोठ्या प्रमाणावर सहभागी करुन घेण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेस वाढता प्रतिसाद असून रविवारी या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ६ हजार ३००  बाल रोगतज्ज्ञांना राज्य शासनाच्या कोविड विषयक बाल रोगतज्ज्ञ टास्क फोर्सने वैद्यकीय उपचाराबाबत व्यवस्थित मार्गदर्शन केले. मुलांमध्ये कोविड आणि कोविडशी संबंधित मानसिक व भावनिक आरोग्याकडे लक्ष देण्यावर देखील चर्चा झाली. लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका, वेळीच डॉक्टरला दाखवा, कोविडविरुद्धची आपली एकजुटीची साखळी मजबूत ठेवून या विषाणूला पराभूत करू, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

विशेष म्हणजे हा कार्यक्रम बालरोग तज्ज्ञांव्यतिरिक्त इतर संस्था व संघटनांमधील सुमारे ५२ हजार डॉक्टर्स आणि हजारो सर्वसामान्य दर्शकांनी विविध माध्यमातून पाहिला. राज्य शासनाने बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सची स्थापना केली असून, डॉ. सुहास प्रभू हे याचे अध्यक्ष आहेत. डॉ.विजय येवले, डॉ. परमानंद आंदणकर हे सदस्य आहेत. या तज्ज्ञांनी लहान मुलांमधील कोविड संसर्गावर मार्गदर्शन केले. तसेच वैद्यकीय उपचाराबाबत विस्तृत माहिती दिली. यावेळी अनेक बालरोग तज्ज्ञांनी विचारलेल्या प्रश्नांना टास्क फोर्सने उत्तरे दिली. यावेळी मुख्य टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. तात्याराव लहाने यांनी देखील यावेळी सूचना केल्या. 

मी केवळ निमित्तमात्र, हे तुमचे यश

यावेळी बोलताना  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोनाविरुद्ध आपण जी लढाई लढत आहोत, त्यात पूर्ण यश नाही पण रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला यश येत आहे. पण यात तुम्ही सगळे डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा, सरकारला सहकार्य करणारे सर्व पक्षांचे लोक, सर्वसामान्य नागरिक यांचे हे यश आहे, मी केवळ निमित्तमात्र आहे. माझी टीम मजबूत व कुशल आहे. कोरोना विषाणूची जशी संसर्गाची साखळी असते, तशी आपण आपली देखील एक घट्ट साखळी तयार करुन, एकजुटीने या विषाणूचा मुकाबला करू, असे आवाहन त्यांनी केले. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेची व्याप्ती वाढत चालली आहे. तिसरी लाट येईल का आणि आली तर लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल, याविषयी सध्या अंदाज आहेत. पण आपण सावध राहिले पाहिजे. पहिल्या लाटेत  ज्येष्ठ नागरिक आणि दुसऱ्या लाटेत तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला. संसर्गाचं वय खाली आलं आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

(हेही वाचाः 10वीच्या परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम! 12वीचं काय? ही आहे शिक्षणमंत्र्यांची भूमिका)

पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करा

कोरोनाचा कहर वाढत असताना कडक निर्बंध लावण्यासारखे कटू निर्णय घ्यावे लागले, यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. ते पुढे म्हणाले की, गेल्या रविवारीच मी राज्यातील सर्व डॉक्टर्सशी बोललो. लहान मुलांच्या बाबतीत तर आपला डॉक्टर्सवर अगदी अंधविश्वास असतो, असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. डॉक्टर जे सांगतील ते उपचार आपण आपल्या लहान मुलांच्या बाबतीत करतो. रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये याची मात्र काळजी घ्या. काय करावे आणि काय करू नये ते नेमके आपल्या डॉक्टर्सकडून समजून घ्या. डॉक्टर्सनी देखील मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावे , योग्य मार्गदर्शन करावे.

जूननंतर लसपुरवठा सुरळीत

दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा व इतर काही बाबींचा तुटवडा जाणवला. पण आपण आता ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी ठोस पावले टाकली आहेत. पुढील काळासाठी सुविधाही वाढवत आहोत. लसीकरणाच्या बाबतीतही १८ ते ४४ वयोगटातील वर्गासाठी १२ कोटी लसी एक रक्कमी घेण्याची आमची तयारी आहे. पण लसी उपलब्ध नाहीत हीच अडचण आहे. आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत आणि मला खात्री आहे, जूननंतर लस पुरवठा सुरळीत सुरू होईल आणि आम्ही महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे लसीकरण वेगाने सुरू करू शकू.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.